(जैन धर्माचे काटेकोरपणे पालन करणारी आणि अन्य जैन धर्मियांनाही धर्माचे पालन करण्याविषयी प्रवृत्त करणारी व्यक्ती ‘जिनशासन रत्न’ असते.)
पुणे, २ जून (वार्ता.) – जयानंद धाम, लोणावळा येथे प.पू. साध्वी श्री नमिवर्षा श्रीजी म.सा. यांच्या २५ व्या दीक्षा दिवसानिमित्त ‘संयम रजत यात्रा महोत्सव’ ३० मे या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी प.पू. आ.भ. मतिचंद्रसागर सुरीश्वरजी महाराज म.सा., प.पू. मुनिराज हिरसागरजी म.सा., प.पू. श्रुतचंद्र सागरजी म.सा. आदी उपस्थित होते. ज्यामध्ये विशेष उपस्थित असलेल्या भारतगौरव, परमपूज्य देवेंद्रजी ब्रह्मचारीजी (मुंबई) आणि डॉ. मौलाना कलवे रुशेद रिझवी हे देहलीहून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक सागर परिवाराचे अध्यक्ष रमेश भाई ओसवाल यांनी दिली. या वेळी विशेष आमंत्रित अतिथींद्वारे श्री नमिवर्षा श्रीजी म.सा. यांना ‘जिनशासन रत्न’ या पदाने सन्मानित करण्यात आले.
त्याचसह पुणे परिसर, गुजरात आणि मध्यप्रदेश इत्यादी भागांतून गुरुमाँ यांनी चातुर्मास केलेल्या २५ विविध संघांचे विश्वस्त अन् श्री संघांचे समर्पित भक्तगण त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. श्री आदिनाथ जैन संघ, परळ (मुंबई) येथील १०० हून अधिक भाविक उपस्थित होते आणि विविध संघांकडून पुढील वर्षाच्या चातुर्मासासाठी विविध ५ संघांकडून विनंती करण्यात आली होती. विशेष म्हणजे रजत यात्रा महोत्सवानिमित्त एका सत्पुरुष कुटुंबाने स्वद्रव्याने एक नवीन जैन मंदिर बांधण्याची घोषणा केली. प्रस्तुत प्रसंगी अनेक ‘जिनशासन’ची प्रभावणा केलेल्या गणमान्य व्यक्तींचा गौरव करण्यात आला आणि अशा ऐतिहासिक संयम रजत यात्रा महोत्सवाची मोठ्या हर्षोल्हासपूर्वक सांगता झाली.