१. राजकीय नेत्यांकडून निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांची उणीदुणी काढण्याचे प्रकार
देशभरातील लोकसभा निवडणुकीचे वादळ पुरते शमले आहे. गेल्या दीड मासापासून राज्यभर प्रचाराचा जो धुरळा उडाला होता, तोही आता शांत झाला आहे. राजकीय विरोधक नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांची उणीदुणी काढताना यंदा अत्यंत खालची पातळी गाठल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळाले. अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःचे राजकीय भवितव्य अबाधित राखण्यासाठी पक्षनिष्ठेला तिलांजली देत ज्या पक्षावर तोंडसुख घेण्यात आयुष्य घालवले, त्याच पक्षाचा हात धरला. घरातील खासदारकी जायला नको; म्हणून काही ठिकाणी वडील एका पक्षात आणि पुत्र दुसर्या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात पहायला मिळाले. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी अनेक ठिकाणी परस्परांवर खोटे आरोप करण्यात आले, एकमेकांचे व्यक्तीगत जीवन चव्हाट्यावर आणले गेले, अशा विविध प्रकारचे चित्र यंदा बर्याच ठिकाणी पहायला मिळाले. पक्ष पालटणे, युती आणि आघाडी यांमुळे जी नेतेमंडळी मागच्या वेळेस विरोधी पक्षांमध्ये होती, ती आता सरकारमध्ये गेली, तर जी सरकारमध्ये होती ती विरोधी पक्षात गेली. त्यामुळे नेत्यांनी विश्वासाने एकमेकांना खासगीत सांगितलेल्या गोष्टीही यंदा भरसभेत लोकांना ऐकायला मिळाल्या. राजकीय नेत्यांच्या कोलांट उड्यांमुळे आणि पालटलेल्या पक्षचिन्हामुळे सामान्य मतदारांचा यंदा गोंधळ झालेला पहायला मिळाला.
२. निवडणूक प्रचारात नीती आणि नैतिक मूल्ये सर्रास धाब्यावर !
निवडणूक प्रचारासाठी निवडणूक आयोगाने व्ययाची मर्यादा ठरवून दिली असली, तरी अनेक ठिकाणी कोट्यधीश उमेदवार उभे असल्याने त्यांच्याकडून ही मर्यादा केव्हाच ओलांडली गेली. मतदारांचा कौल स्वतःच्या दिशेने वळवण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद सर्वांचा वापरल्याचे दिसले. मतदारांनी आपल्याला मतदान करावे, यासाठी अनेक ठिकाणी मतदारांना पैसे, मद्य किंवा भेटवस्तू देण्यात आल्या. काही ठिकाणी तर विरोधक पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्यांनाही पैसे देऊन फोडण्यात आले. मतदारांना धमकावण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी घडले. अनेक ठिकाणी बोगस (खोटे) मतदान झाले. विरोधी पक्षाला मतदान केले; म्हणून मारहाणीच्याही घटना घडल्या, लोकांची दिशाभूल व्हावी म्हणून एकाच नावाचे अनेक उमेदवार अपक्ष म्हणून उभे करण्यात आले. जातीच्या आणि धर्माच्या आधारावर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी भाषिक आणि प्रांतीय वादाची ठिणगी निवडणूक प्रचारातही पडल्याचे पहायला मिळाले. निवडणूक म्हणजे राजकीय पक्षांसाठी एक युद्धच असल्याने ते जिंकण्याच्या हेतूने नीती आणि नैतिक मूल्ये यांना पुरते डावलण्यात आले. ‘आम्हीच जनतेचे कसे भले करू शकतो’, ‘आमचाच पक्ष कसा जनतेला सुख, समाधान आणि सुरक्षा देऊ शकतो’, याच्या बढाया प्रचार सभा आणि घोषणापत्र यांतून मारण्यात आल्या.
३. …असे केल्याने कर्मसिद्धांतापासून सुटका होणार का ?
राजकीय पक्षातील अनेक मंडळी सश्रद्ध असल्याने काहींनी निवडणुकीचा प्रचार चालू करतांना, काहींनी प्रचार थांबल्यानंतर, तर काहींनी निवडणूक पार पडल्यानंतर त्यांच्या त्यांच्या उपास्य देवतेच्या किंवा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये जाऊन देवतेच्या चरणी लोटांगण घातले. निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशीही हे चित्र सर्वत्र पहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना मायबाप मानून त्यांच्या चरणी लोटांगण घालणारी ही मंडळी आता ‘निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागावा, स्वतःच्या पक्षाचे सरकार बहुमताने सत्तेत यावे’, यासाठी भगवंताच्या चरणी नतमस्तक होतांना दिसत आहेत. जगनियंता परमेश्वर नेतेमंडळींच्या या सर्व गोष्टी पहात आहे. ‘प्रचारात गर्वाने आम्हीच लोकांचे भले करू’, असे म्हणणारी ही मंडळी आज जरी त्याच्या चरणी नतमस्तक झाली असली, तरी एकूणच प्रचारात त्यांनी नैतिकता किती ठिकाणी पायदळी तुडवली, जनतेला खोटी आश्वासने किती ठिकाणी दिली, जनतेची कशी फसवणूक केली, स्वार्थासाठी दडपशाहीचा आणि धनाचा वापर किती वेळा केला, एकमेकांवर खोटे आरोप किती वेळा केले, याची सारी गोळा बेरीज त्या भगवंताच्या ठिकाणी नोंद झाली आहे. त्याचे फळ या मंडळींना आज ना उद्या नक्कीच मिळणार आहे.
‘भगवंताला शरण गेलो, म्हणजे माझी सारी पापे धुतली जातील’, असे होणार नाही. पक्षासह उभे राहिलेल्या उमेदवाराने जनतेसाठी आजतागायत केलेले कार्य, जनतेप्रती त्यांना वाटणारी कणव, जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी वापरलेली प्रचारनीती या सर्वांचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसणारच आहे. भगवंताला जशी त्याला शरण आलेल्याची काळजी असते, तशी समस्त जनतेचीही असते. त्यामुळे जनतेला जो आवश्यक आहे, तो खासदार निवडून येणारच आहे. ज्या पक्षामुळे देशाचे कल्याण साधणार आहे, अशा पक्षाचे सरकार सुद्धा केंद्रात सत्तेत येणार आहे; मात्र निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत राजकीय स्वार्थासाठी नेतेमंडळींनी जी काही चुकीची कर्मे केली, त्याचेही फळ येणार्या काळात त्यांना भोगावे लागणार आहे. भगवंत भक्ताला साहाय्य करत असला, तरी भक्तसुद्धा नीतीने आणि धर्माने वागणारा हवा. कर्माची फळे भगवान शिवाचा परमभक्त महाबली रावणाला चुकली नाहीत; भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांची जिथे कर्मसिद्धांतापासून सुटका झाली नाही, तिथे राजकीय नेत्यांची काय गत आहे ! त्यामुळे राजकीय नेतेमंडळींनी चुकीची कर्मे करून देवाकडे याचना करण्यापेक्षा राजधर्माचे पालन करून भगवंताची कृपा संपादन करावी !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई. (३१.५.२०२४)