थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये ३ दिवसांपूर्वीच मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून सखल भागांत पाणीही साचले आहे. कोट्टायम आणि इडुक्की या जिल्ह्यांत पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्रिसूर जिल्ह्यातील सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
आसाममध्ये पूरस्थितीमुळे साडेतीन लाख लोक बाधित
आसाममध्येही मोसमी पावसामुळे ११ जिल्ह्यांतील साडेतीन लाख लोक बाधित झाले आहेत. जवळपास ३० सहस्र लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. कचार जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १९ सहस्र ९९७ लोक प्रभावित झाले आहेत. ‘रेमल’ चक्रीवादळानंतर झालेल्या संततधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील रस्ते आणि रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे.