‘वैशाख कृष्ण अष्टमी (३१.५.२०२४) या दिवशी माझ्या आई-बाबांच्या (सौ. जया यशवंत शहाणे (वय ७६ वर्षे) आणि श्री. यशवंत सदाशिव शहाणे (वय ७८ वर्षे) यांच्या) विवाहाचा ५० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने ‘माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी माझ्यावर ‘माझी साधना अन् आश्रमजीवन यांसाठी अत्यंत पूरक ठरतील’, असे केलेले अमूल्य संस्कार’, यांविषयी सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि अतिशय कृतज्ञताभावाने मी हे लिखाण करत आहे, तसेच माझे यजमान श्री. अभय वर्तक यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रेही येथे दिली आहेत.
श्री. यशवंत शहाणे आणि सौ. जया शहाणे यांना विवाहाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. सौ. रूपाली अभय वर्तक (श्री. यशवंत शहाणे आणि सौ. जया शहाणे यांची कन्या), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. सौ. जया शहाणे
१ अ १. कष्टाळू : आई अतिशय कामसू आणि कष्टाळू आहे. ती पुष्कळ गतीने सर्व कृती करू शकते. तिच्या या गुणांचा माझ्यावर सखोल संस्कार झाला. त्यामुळे सासरी कितीही कामे करावी लागली किंवा आश्रमजीवनात शारीरिक सेवा कराव्या लागल्या, तरी मला अवघड गेले नाही.
१ अ २. परिस्थितीशी त्वरित जुळवून घेणे : आई कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते. त्यामुळे एखाद्या गोष्टीवाचून तिचे कधीही नडत नाही.
१ अ ३. आसक्ती नसणे : तिला कपडे, दागिने, पैसे या गोष्टींचा हव्यास नाही.
आईमध्ये ‘इतरांचा विचार करणे, प्रेमभाव, क्षात्रवृत्ती’, असे अनेक गुण आहेत. आपत्काळात निभावून जाण्यासाठी आवश्यक असणारे अनेक गुण तिच्यामध्ये आहेत. या सर्व गुणांचा लहानपणापासून माझ्यावर कळत-नकळत संस्कार झाला. त्याचा मला साधनेत पुष्कळ लाभ झाला.
१ आ. श्री. यशवंत शहाणे
१ आ १. शिस्त लावणे : मी आई-बाबांची एकुलती एक मुलगी असूनही त्यांनी माझे कधीही अनावश्यक लाड केले नाहीत. अगदी लहानपणीच मला त्यांनी दिनचर्या घालून दिली होती. ‘पहाटे उठणे, सूर्यनमस्कार घालणे, रामरक्षास्तोत्र म्हणणे, इंग्रजी शब्दांचे ‘स्पेलिंग’ पाठ करणे’, यांसारख्या काही गोष्टी अनिवार्य होत्या.
१ आ २. चिकाटी : बाबांनी एखादी गोष्ट करायची मनावर घेतली की, ते ती प्रामाणिकपणे पूर्ण करतातच. ‘न कंटाळता चिकाटीने अथक प्रयत्न करणे’, हा त्यांच्यातील गुण देवाच्या कृपेने माझ्यात आला आहे.
१ आ ३. आदर्श जीवन जगण्याचा संस्कार करणे : त्यांनी लहानपणापासून माझ्यावर प्रगल्भ विचारांचा संस्कार केला. अधूनमधून ते माझा ‘सत्संग’ किंवा ‘बौद्धिक’ घेत. ते मला सांगत, ‘‘आपले जीवन आदर्श असले पाहिजे. आपण सामान्य असलो, तरी ते आदर्श साध्य करण्यासाठी आपण कष्टपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
१ आ ४. चुका सांगून साहाय्य करणे : त्यांच्या लक्षात आलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चुका आणि माझ्या चुका ते मला न कंटाळता त्यांची साधना म्हणून सांगतात. याखेरीज ‘प्रामाणिकपणा, तत्त्वनिष्ठता, वक्तशीरपणा, काटकसर, नियोजनबद्ध आणि परिपूर्ण कृती करण्यासाठी प्रयत्न करणे, सतत वाचन आणि अभ्यास करणे’, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत.
१ इ. आई-वडिलांची सामायिक गुणवैशिष्ट्ये
१ इ १. वेळेचा सुयोग्य वापर : आई-बाबा सधन असूनही त्यांची प्रथमपासूनच मौजमजा करून जीवन जगण्याची वृत्ती नाही. ते दोघेही पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत कार्यरत असतात. ते दोघेही कधी वेळ वाया घालवत नाहीत. त्यामुळे लहानपणापासून माझ्याही मनात कधी ‘मौजमजा करावी’, असे विचार आले नाहीत.
१ इ २. शरीरस्वास्थ्य चांगले ठेवून स्वावलंबी रहाणे : आई-बाबा दोघांनीही अनेक वर्षे योगसाधना करून त्यांचे शरीरस्वास्थ्य त्यांच्या वयोमानानुसार इतरांच्या तुलनेत पुष्कळ चांगले ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरस्वास्थ्यासाठी मला कधी वेळ द्यावा लागला नाही. आता ते देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाच्या जवळ रहातात. तरीही त्यांचे शरीरस्वास्थ्य बिघडून अगदी अशक्य स्थिती झाली, तरच ते मला संपर्क करतात; अन्यथा ते स्वतःचे स्वतः निभावून नेतात. शक्यतो ते स्वतःच आधुनिक वैद्यांकडे जाऊन औषधे आणतात. त्यांचे ते सर्व करतात. त्यांनी त्यांच्या जीवनाची घडी माझ्यावर अवलंबून न रहाता व्यवस्थित बसवली आहे.
१ इ ३. साधना किंवा सेवा सोडून घरी येण्याची अपेक्षा नसणे : मी पूर्ण वेळ साधना करू लागल्यावर २५ वर्षांपैकी २२ वर्षे मी वर्षातून केवळ २ – ३ वेळा आणि तेही केवळ ३ – ४ दिवसांसाठीच घरी जाते. मी एकुलती एक मुलगी असूनही त्यांनी ‘मी घरी यावे’, अशी कधी अपेक्षा केली नाही. माझ्या सेवेच्या वेळेत ते मला कधीही संपर्क करत नाहीत आणि अन्य नातेवाइकांनाही त्यांनी तसे सांगितले आहे.
१ ई. वडिलांमध्ये झालेले पालट !
१. गेल्या ३ वर्षांमध्ये बाबांनी स्वतःमध्ये काही पालट केले आहेत. ‘आईला साहाय्य करणे, ती आहे, तशी तिला स्वीकारणे, त्यासाठी स्वतःमध्ये पालट करणे’, असे प्रयत्न ते करतात.
२. त्यांच्यातील ‘नकारात्मक विचार करणे’, या स्वभावदोषाचे प्रमाण थोडे न्यून झाले आहे. त्यामुळे आता त्यांना आध्यात्मिक स्तरावरील अनुभूतीही येतात.
३. त्यांनी माझ्या किंवा दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चुका सांगितल्यावर मी योग्य प्रतिसाद न दिल्यास पूर्वी त्यांना त्याचा मानसिक त्रास व्हायचा. आता त्यांना तसा त्रास होत नाही. आता ते त्यांची साधना म्हणून मला चुका सांगतात.
१ उ. अनुभूती
१ उ १. कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून देवाने साहाय्य करून अडचणी सोडवणे : घरात पाणी, नळ, वीज, दुचाकी, संगणक, घरातील साहित्य आणणे किंवा अधिकोष इत्यादींच्या संदर्भात काही अडचणी येतात, तेव्हा बाबा स्वतः काही ना काही प्रयत्न करतात आणि देवाला प्रार्थना करतात. तेव्हा ‘देव त्यांच्या अडचणी कुणाच्या तरी माध्यमातून सोडवतो’, अशी अनुभूती बाबांनी अनेक वेळा घेतली आहे आणि घेत आहेत.
१ उ २. आईच्या अपघाताच्या प्रसंगी अनुभवलेली गुरुकृपा ! : काही वर्षांपूर्वी धर्मप्रचाराच्या सेवेला जात असतांना आईला मागून एका गाडीने धडक दिल्याने ती मार्गावर पडली. गुरुकृपेने मार्गावरून जाणार्या एका माणसाने तिच्या भ्रमणभाषमधील एका क्रमांकावर संपर्क केला. तो नेमका जवळच्या आणि चारचाकी उपलब्ध असणार्या साधिकेचा होता. त्या साधिकेने तत्परतेने येऊन आईला रुग्णालयात भरती केले.
१ उ ३. आईच्या सोन्याच्या बांगड्या चोरायचा विफल झालेला प्रयत्न : काही वर्षांपूर्वी धर्मप्रचाराच्या सेवेला जात असतांना गर्दीच्या ठिकाणी अकस्मात् २ अज्ञात व्यक्ती आईजवळ येऊन तिला ‘पुढे काहीतरी गोंधळ झाला आहे’, असे सांगून हातातील सोन्याच्या बांगड्या काढून देण्याविषयी तिच्यावर दबाव आणत होत्या. गुरुकृपेने तिने नामजप चालू केला आणि प्रसंगावधान राखून तिने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली.
वरील प्रसंगांतून ‘मी साधना करत असल्यामुळे देव माझ्या आई-बाबांची काळजी घेत आहे’, हे माझ्या लक्षात आले.
१ ऊ. अकस्मात् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ यांची भेट होणे : फेब्रुवारी २०२३ मध्ये आई-बाबांना अकस्मात् श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या भेटीचा योग आला. तेव्हा बाबांची भावजागृती झाली. दोघांनाही पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
बाबा प्रथम सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागले. त्यांच्यामुळेच मला साधना करण्याची प्रेरणा मिळाली. आई-बाबांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळे मला आश्रमजीवन सहजतेने स्वीकारता आले.’
२. श्री. अभय वर्तक (श्री. यशवंत शहाणे आणि सौ. जया शहाणे यांचे जावई), धर्मप्रचारक, सनातन संस्था
२ अ. श्री. यशवंत शहाणे
२ अ १. शांत आणि संयमी : ‘शहाणेकाका सौ. शहाणेकाकूंवर रागावले आहेत किंवा त्यांच्यावर रागावून बोलले आहेत’, असे प्रसंग मी कधी पाहिले नाहीत. काकूंकडून एखादी गोष्ट करायची राहिली किंवा विसरली, तर ते स्वतः ती कृती करून त्यांना त्याविषयी प्रेमाने सांगतात. ‘संयम’ हा त्यांच्यामधील वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे.
२ अ २. काटकसरी असूनही पैशांविषयी अनासक्ती : शहाणेकाका ‘पैशाचा योग्य उपयोग आणि बचत’, यांविषयी पुष्कळ सतर्क असतात. ते कुठेही पैसे अनावश्यक व्यय करत नाहीत; परंतु योग्य ठिकाणी धन व्यय करण्यास ते मागे-पुढे पहात नाहीत. ते काटकसरी आहेत; परंतु त्यांच्याकडे असलेल्या पैशांविषयी त्यांच्या मनात आसक्ती नाही किंवा त्याविषयी अहंकारही नाही. ‘पैसे व्यवस्थित सांभाळत असतांना पैशांविषयी अनासक्ती असणे’, हा दुर्लभ संयोग त्यांच्यामध्ये आहे.
२ अ ३. मनमोकळेपणाने बोलणे आणि चुकाही सौम्य शब्दांत सांगणे : शहाणेकाका नेहमी त्यांच्या मनातील गोष्टी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतात. त्याच समवेत ते माझ्याकडून झालेल्या चुकाही मला मोकळेपणाने आणि सौम्य शब्दांत आवर्जून सांगतात.
२ अ ४. जावयाच्या बहिणीची आपुलकीने काळजी घेणे : मी सेवेच्या निमित्ताने नेहमी बाहेरगावी असतो. माझी बहीण पनवेल येथे रहाते. तिला काही अडचण आली, तर त्या प्रसंगांत ते तिला साहाय्य करतात. ते तिच्याशी प्रेमाने बोलतात आणि आपुलकीने तिला व्यावहारिक गोष्टींमध्ये मार्गदर्शन किंवा साहाय्य करतात.
२ आ. सौ. जया शहाणे
२ आ १. साधेपणा : सौ. काकूंच्या स्वभावामध्ये निरागसता असून साधेपणाही आहे.
२ आ २. प्रेमभाव
अ. त्या त्यांच्या घरी आलेल्या प्रत्येकाला काहीतरी खाऊ खायला देऊन त्याला प्रेम देतात.
आ. मी कधीही बाहेर जायला निघाल्यावर त्या मला खाऊसाठी थोडे पैसे देतात. ‘केवळ एक ‘आई’च असे प्रेम करू शकते. माझे वय ५० वर्षे असूनही त्यांनी दिलेल्या त्या खाऊच्या पैशांचे मला पुष्कळ अप्रूप वाटते आणि मला मी लहान झाल्याचा अनुभव येतो.
इ. मी प्रवासाला निघतांना ‘मी कसा जाणार ?’, ‘जेवणासाठी डबा काय घेणार ?’, याची त्यांना नेहमी काळजी असते. त्या शहाणेकाकांना ‘माझा प्रवास व्यवस्थित झाला का ?’, ‘मी इच्छित स्थळी नीट पोचलो का ?’, याचा पाठपुरावा घेण्यास आवर्जून सांगतात.
२ आ ३. सेवेची तळमळ : आता वयोमानाने त्यांना पूर्वीसारखे प्रचाराला बाहेर जाणे शक्य होत नाही; मात्र त्यांच्या मनात सेवेला जाण्याची इच्छा असते. त्या म्हणातात, ‘‘मी एखाद्या वसाहतीत किंवा जवळपास प्रचाराला जाऊ शकते.’’ त्या तसे प्रयत्नही करतात.
२ इ. श्री. शहाणे आणि सौ. शहाणे यांच्या संदर्भात जाणवलेले सामायिक सूत्र
२ इ १. जावयाकडे मुलगा म्हणून पहाणे आणि त्याला आईचे प्रेम देणे : शहाणेकाका-काकूंनी मला जावई म्हणून माझ्या गुणदोषांसह स्वीकारले आहे. ते नेहमी मला समजून घेतात. ‘दोघांचा माझ्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन ‘जावई’ म्हणून नसून ‘मुलगा’ म्हणूनच आहे’, असे मला जाणवते. माझ्या आईचे मी तरुण असतांनाच निधन झाले. ‘तिची भरपाई हे दोघे करतात’, असे मला नेहमीच जाणवते.
‘गुरुकृपेने मला असे सासू-सासरे मिळाले’, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सर्व सूत्रांचा दिनांक २६.५.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |