आतापर्यंत ५० मुलांना विकले, ११ अर्भकांची सुटका !
भाग्यनगर (तेलंगाणा) – लहान मुलांची तस्करी करणार्या एका टोळीतील ३ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या टोळीकडून ११ अर्भकांचीही सुटका केली आहे. आंतरराज्यीय स्तरावर मुलांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. लहान मुलांची तस्करी करणारी टोळी देहली आणि पुणे परिसरात गरीब पालकांकडून मुले विकत घेऊन आंध्रप्रदेश अन् तेलंगाणा राज्यांत अपत्ये नसणार्या जोडप्यांना त्यांची विक्री करत असे. दीड लाखांपासून साडेपाच लाख रुपयांपर्यंत त्यांना विकले जाई.
या प्रकरणासंदर्भात रचकोंडाचे पोलीस आयुक्त डॉ. तरुण जोशी यांनी सांगितले की, २२ मे या दिवशी भाग्यनगर येथील मेडीपल्ली भागातून एका व्यक्तीकडून मुलीच्या ‘विक्री’संदर्भात तक्रार आली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत २ महिलांसह एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्या वेळी हे लोक बाळ विकण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता नवी देहली आणि पुणे येथून आणलेली बालके विकण्याचे मोठे षड्यंत्र असल्याचे धक्कादायक सूत्र समोर आले.