दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : धारावीत २८ मे या दिवशी पहाटे आग; मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज…

धारावीत २८ मे या दिवशी पहाटे आग

मुंबई – धारावी येथील ९० फूट रस्त्यावरील अशोक मिल कंपाऊंड नजीकच्या ३ मजली इमारतीला २८ मे या दिवशी पहाटे ४ च्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत एकूण ६ जण घायाळ झाले आहेत. आग विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने आगीचा डोंब उसळला. या घटनेत मोठी हानी झाली आहे.


मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज

मुंबई – मुंबईसह उपनगरांत पुढील ४ दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेले २ दिवस या भागांतील उकाडा अल्प झाला आहे.


गडचिरोली येथील जहाल नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण !

गडचिरोली – छत्तीसगड राज्यातील विविध चकमकींमध्ये सहभागी झालेल्या एका जहाल नक्षल्याने गडचिरोली येथे केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. गणेश गट्टा पुनेम (वय ३५ वर्षे) असे त्याचे नाव आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर त्याला गडचिरोली जिल्हा पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले.


ठाणे येथे कबड्डी प्रशिक्षकाकडून कबड्डीपटूची हत्या !

ठाणे – कोलशेत येथे एका १७ वर्षीय कबड्डीपटूची तरुणीची तिच्या प्रशिक्षकाने गळा आवळून आणि कात्रीने गळ्याभोवती भोसकून हत्या केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून प्रशिक्षक गणेश गंभीरराव (वय २३ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. गणेशचे तिच्यावर प्रेम होते. ती इतर कुणाशी तरी बोलते, या संशयामुळे त्याने हा प्रकार केला.

संपादकीय भूमिका : अशा विकृतांना कारागृहातच डांबायला हवे !


पुणे येथे भरधाव ट्रकने २ दुचाकीस्वारांना चिरडले !

पुणे – येथील नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका येथे भीषण अपघात झाला आहे. २७ मेच्या रात्री एका भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली, यामध्ये २ दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. दोघे जण ट्रकखाली सापडल्यानंतरही ट्रकने त्यांना फरफटत पुढे नेले. यामध्ये एक जण घायाळ झाला.


अटकेतील आरोपी डॉ. अजय तावरेंची संबंधित सर्वांची नावे उघड करण्याची चेतावणी

कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ अपघात प्रकरण !

पुणे – पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी मुलाचे ‘ब्लड सँपल’ केरात टाकून अन्य व्यक्तीचा अहवाल पाठवल्याच्या प्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरि हरलोर यांना नुकतीच अटक करण्यात आली. याविषयी पोलीस तपासात डॉ. तावरेंनी सांगितले की, मी शांत बसणार नाही. सर्वांची नावे उघड करणार. ही माहिती प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची चौकशी केली आहे.