आयुक्त शेखर सिंह यांचे पालखी सोहळा नियोजनासाठी आयोजित बैठकीत आश्वासन !
पिंपरी (जिल्हा पुणे) – आषाढीवारी पालखी सोहळ्याचे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही शहरात आगमन होत आहे. या वेळी विविध सोयीसुविधांमध्ये न्यूनता रहाणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. इतर आस्थापनांसोबत समन्वय साधून उत्तम सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी पालखी सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आणि पालखी मार्गावर देण्यात येणार्या सुविधांसाठी आराखडा सिद्ध करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘आषाढी वारी पालखी सोहळा २०२४’च्या नियोजनासाठी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
या वेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, आळंदी, तसेच देहू संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे, सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, विठ्ठल मंदिर, आकुर्डीचे विश्वस्त माजी नगरसेवक गुलाब कुटे आदींसह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.