|
शेवगाव (जिल्हा नगर) – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शेवगावची ‘दत्तभूमी’ तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास येण्यासाठी, तसेच साधक आणि दत्तभक्त यांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले.
प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘गुरुदत्त सामाजिक संस्थे’च्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणार्या राज्यस्तरीय आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात आमदार राजळे अध्यक्षपदावरून बोलत होत्या. स्वामी समर्थ कृपांकित प.पू. नारायण भाटे (पुणे), नाथ संप्रदायाचे संशोधक आणि प्रवचनकार मिलिंद चवंडके (नगर) यांना आध्यात्मिक, तर ‘महंत निश्चलपुरी फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. धर्मवीर भारती (लातूर) यांना ‘सामाजिक कार्य गौरव पुरस्कारा’ने अनुक्रमे प.पू. गजानन कस्तुरे (नाशिक), आमदार मोनिका राजळे, वित्त विभाग एम्.एस्.डी.एल्.चे (‘महावितरण’चे) (मुंबई) संचालक अनुदीप दिघे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र, शाल, पुष्पहार, तसेच प्रत्येकी ११ सहस्र रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अनेक प्रकारचे दुःख झेलत विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने काम करणार्या पुरस्कारार्थींचा गौरव करणार्या ‘गुरुदत्त संस्थे’चे आमदार राजळे यांनी कौतुक केले. दादाजींना अभिप्रेत असलेले नि:स्वार्थ सेवेचे कार्य होत असल्याबद्दल त्यांनी पदाधिकार्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ साधक पी.बी. शिंदे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्यांचाही या वेळी आमदार राजळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ‘गुरुदत्त संस्थे’चे अध्यक्ष अर्जुनराव फडके, सचिव फुलचंद्र रोकडे, ज्येष्ठ साधक आणि योगतज्ञ दादाजी यांचे पुत्र पू. शरद वैशंपायन, सर्वश्री अतुल पवार, रवींद्र पुसाळकर, प्रशांत दिघे सर्वश्री उदय देशपांडे, तसेच जेष्ठ कार्यकर्ते अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, अधिवक्ता विजयराव काकडे, अधिवक्ता संजय सानप, महेश फलके, बंडू रासने, अनिल पुरी, उप-अभियंता प्रल्हाद पाठक, इंजि.बाळासाहेब मुरदारे तसेच गुरुदत्त संस्थेचे सेवाभावी कार्यकर्ते सर्वश्री पी.बी.शिंदे, बाबुशेठ जोशी, सुरेश घुले, मनीष बाहेती, लक्ष्मण काळे, नीलेश रोकडे, संजय कुलकर्णी, प्रदीप हारके, जगन्नाथ गोसावी, निवृत्ती गोरे, अभय पालवे, कृष्णमुरारी गाडे, महेश देशमुख, वैभव भोर, योगेश तायडे, अमित आहुजा, प्रशांत गोसावी, बन्सी पांगरे, सुभाष गोलांडे,ओमप्रकाश बाहेती, पुरुषोत्तम धूत, योगेश रोकडे, शेखर रोकडे आदी उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक दिलीप फलके यांनी तर, आभारप्रदर्शन काकासाहेब लांडे यांनी केले.
पुरस्काराची रक्कम ‘गुरुदत्त संस्थे’ला साभार परत !
‘गुरुदत्त सामाजिक संस्थे’च्या अजोड कार्याची नोंद घेत डॉ. धर्मवीर भारती (लातूर) यांनी पुरस्काराच्या ११ सहस्र रुपये रकमेत आणखी २० सहस्र रुपयांची भर घालून रोख ३१ सहस्र रुपये तर, प.पू. नारायण भाटे (पुणे) यांनी ११ सहस्र रुपये संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके आणि सचिव फुलचंद रोकडे यांच्याकडे सुपुर्द केले.
२५ मे २०२४ या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची पाचव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे समाजातील गरजू व्यक्तींना अन्नधान्यवाटप करण्यात आले. ९० गरजू व्यक्तींनी याचा लाभ घेतला. या वेळी योगतज्ञ प.पू. दादाजी यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन आणि स्नुषा सौ. ललिता शरद वैशंपायन यांच्या हस्ते ‘अन्नधान्य किट’ गरजूंना वाटण्यात आले. |