रत्नागिरी जिल्ह्यात १० जूनपर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लोकसभा मतदार संघ ४६-रत्नागिरी -सिंधुदुर्ग आणि ३२ रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ४ जून या दिवशी होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २७ मे ते १० जून या कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई आदेश लागू करण्यात आल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, वर्तमानपत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरुध्द टीका टिपणी करणे, सामाजिक माध्यमांवर एकमेकांच्या विरोधात माहिती प्रसारित करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे किंवा आरोप-प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होवून, तणाव निर्माण होवून, त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

मतमोजणी शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र न बाळगणे आणि बरोबर घेवून न फिरणे यांस मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)  नुसार कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही सूर्यवंशी यांनी दिली आहे.