मावळ (जि. पुणे) येथे ३०० ग्राहकांची बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक !

दोन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा नोंद

प्रतिकात्मक चित्र

तळेगाव दाभाडे (पुणे) – जांभूळ (तालुका मावळ) येथील ‘अतुल्य कॅलेक्स’ या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये पिंपरी, चिंचवड, पुणे शहर परिसरातील ३०० हून अधिक ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक गौरव सोमाणी आणि नितीन जाजू यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘कॅलेक्स स्पेसेस’ या आस्थापनाकडून डिसेंबर २०१८ मध्ये जांभूळ येथे ‘अतुल्य कॅलेक्स’ या गृहनिर्माण प्रकल्पाचे विज्ञापन करण्यात आले. त्यात ग्राहकांना आकर्षक सवलतींचे आमीष दाखवले. त्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि पुणे परिसरातील अनेकांनी सदनिकेची नोंदणी केली. मार्च २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन विकासकांनी दिले होते. वारंवार मुदतवाढ देऊन अद्यापपर्यंत प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांनी मिळून विकासकांच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली आहे. (बांधकाम व्यावसायिकांनी गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण न करणे, ग्राहकांचे पैसे अडकवून ठेवणे असे अनेक प्रकार होतात. याविषयी बांधकाम व्यावसायिकांवर वचक बसवण्यासाठी प्रशासन काय करणार ? – संपादक)