Ajit Doval Faster Progress : देशाच्या सीमा सुरक्षित असत्या, तर आपली प्रगती वेगाने झाली असती !

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे विधान !

अजित डोभाल

नवी देहली – कुठल्याही देशाच्या सीमा महत्त्वाच्या असतात; कारण त्या  स्वायत्तता परिभाषित करतात. आपल्या देशाच्या सीमा अधिक सुरक्षित, स्पष्ट असत्या आणि लाटण्यात आल्या नसत्या, तर आपण अधिक वेगाने प्रगती केली असती, असे विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी येथे केले. ते सीमा सुरक्षा दलाच्या (‘बी.एस्.एफ्’च्या) २१ व्या पदप्रदान समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘रुस्तमजी स्मृती व्याख्याना’त बोलत होते.

भविष्यात देशाच्या सीमा सुरक्षित असतीलच, असे नाही !


डोभाल पुढे म्हणाले की, भविष्यात गतिमान आर्थिक विकासासाठी आपल्या सीमा जितक्या सुरक्षित असायला हव्यात तितक्या त्या असतील, असे मला वाटत नाही. त्यामुळे सीमा सुरक्षा दलांचे दायित्व मोठे आहे. त्यांनी २४ घंटे सतर्क रहाणे आवश्यक आहे. जी भूमी आपल्या नियंत्रणात असते, तीच आपली असते. सरकारने गेल्या १० वर्षांच्या कालावधीत सीमेच्या सुरक्षेकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले असून या कालावधीत आपली राष्ट्रीय शक्ती प्रचंड वाढली आहे.