सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ‘सिंगल यूज प्लास्टिक’ वापरणार्‍या आस्थापनांना ७ लाख रुपये दंड !

६५२ किलो प्लास्टिक जप्त !

सांगली, २४ मे (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर करणार्‍या आस्थापनांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणार्‍या आस्थापनांकडून ६५२ किलो प्लास्टिक जप्त करून ७ लाख रुपये दंडाची आकारणी करण्यात आली.

महापालिकेने ५ मार्चपासून ही कारवाई चालू केली असून २४ मे पर्यंत ६५२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. सदर दंडाच्या रकमेचा पर्यावरण संवर्धनासाठी वापर करण्यात येणार आहे. गटारी आणि नाले येथे ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर वाढल्यामुळे सांडपाणी वाहून नेण्याच्या प्रक्रियेस अधिक प्रमाणात अडथळा निर्माण होत आले.

पर्यावरणामध्ये प्लास्टिकचा वापर वाढल्याने शासनाने महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) नियम २००६ अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ चे उल्लंघन केल्यास पहिल्या गुन्ह्याला ५ सहस्र, तर दुसर्‍या गुन्ह्याला

१० सहस्र, तसेच तिसर्‍या गुन्ह्याला २५ सहस्र रुपये आणि ३ महिने कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान केले आहे. आस्थापनांनी ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर न केल्यास पर्यावरणात या प्लास्टिकचा वापर होणार नाही. जी आस्थापने नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे.