आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत ! – अमितेश कुमार, पुणे पोलीस आयुक्त

कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ अपघात प्रकरण !

  • गाडीचा चालक पालटण्याचा प्रयत्न !
  • आरोपीवर ३०४ कलमानुसार अन्वेषण चालू !

पुणे – कल्याणीनगर येथे ‘पोर्शे’ अपघात प्रकरणामध्ये पोलीस प्रारंभीपासून बारकाईने काम करत आहेत. आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत. त्यामुळे दबाव किंवा दिरंगाई झाली, असे म्हणणे योग्य नाही. आरोपीला काही विशेष सुविधा देण्यात आली किंवा काही खाद्यपदार्थ देण्यात आले, याविषयी पुरावे मिळालेले नाहीत. तरी आम्ही या प्रकरणी अन्वेषण करत आहोत. कलम ३०४ लावण्यास विलंब का झाला ? याची चौकशी चालू आहे; पण कुणाचा आमच्यावर दबाव आहे, असे म्हणणे योग्य नाही, असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

गाडीचालक पालटण्याचा प्रयत्न !

जे आरोप होत आहेत, त्याप्रकारचे काही आमच्या अन्वेषणांमध्ये आढळून आले नाही. ‘मद्यामुळे आरोपीला काही कळतच नव्हते’ अशी परिस्थिती नव्हती. आरोपी पूर्ण शुद्धीत होता, हा आमचा युक्तीवाद आहे. आम्ही सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण पहात आहोत. अन्वेषण चालू आहे. काही काळाने गाडीचालक पालटण्याचा प्रयत्न झाला, हे सत्य आहे. प्रारंभी चालकाने सांगितले की, ‘त्यानेच गाडी चालवली होती.’ त्याने कुणाच्या दबावामुळे हे म्हटले होते, याचेही अन्वेषण चालू आहे. घटनेचा सर्व क्रम आम्हाला समजला आहे. आमदार सुनील टिंगरे हे पोलीस ठाण्यात आले होते, हे खरे आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

अपघातप्रकरणी प्रारंभी दिरंगाई झाली, हे सत्य आहे. घटनाक्रम कळताच ३०४ कलम लावले आहे. गुन्हे शाखेकडून युद्धपातळीवर अन्वेषण चालू आहे. पार्टीमध्ये १० ते १२ जण होते. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये ४ जण होते. काही निष्काळजीपणा आणि दोष येरवडा पोलीस अधिकार्‍यांनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होईल.

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांची धमकी !

सुरेंद्रकुमार यांनी वर्ष २०२१ मध्ये कोंढवा येथील एका जागेच्या व्यवहारामध्ये आर्थिक फसवणूक केली, तसेच कार्यालयामध्ये बोलावून मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप मुश्ताक मोमीन यांनी केला आहे. याविषयी पोलीस केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली होती. अद्याप आम्हाला न्याय मिळाला नसल्याचे मोमीन यांनी सांगितले.

आमदार रवींद्र धंगेकर यांचे उपोषण !

राष्ट्रीय काँग्रेसचे कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर हे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते. या अपघात प्रकरणामध्ये पोलिसांनी पैसे खाल्ल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे स्थानांतर करण्यात यावे, यासाठी मी प्रतिदिन पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणार, अशी चेतावणी धंगेकर यांनी दिली आहे.

अग्रवाल कुटुंबियांकडून आक्षेपार्ह विधाने !

मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी ‘मुलाला गाडीची चावी द्यायला नको होती’, असे मान्य केले होते. आता ‘तो गाडी चालवत नव्हता. आमचा कुटुंबाचा (फॅमिली) गाडीचालक हाच गाडी चालवत होता’, असे विशाल अग्रवाल यांनी सांगितले. मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल म्हणतात, ‘‘बाळाला मीच गाडीची चावी दिली. पार्टीसाठी व्यय करण्यासाठी ‘क्रेडिट कार्ड’ देण्यास मीच विशालला भ्रमणभाष करून सांगितले होते.’’ आरोपीने प्रथम ‘मीच गाडी चालवत होतो’, असे सांगितले होते. आता तोच म्हणतो, ‘मी गाडी चालवत नव्हतो, तर गाडीचालकच चालवत होता.’

जबाबात गाडीचालक म्हणाला की, मुलाने जर कार मागितली, तर त्याला चालवू दे ‘तू बाजूला बस’, अशी सूचना विशाल अग्रवाल यांनी दिली होती. गाडीत बिघाड होता. तरीही मुलाला कार चालवायला दिली असल्याचा खुलासा चालकाने केला आहे.