अमरावती येथे शाळेच्या प्रवेश अर्जांची ५०० ते सहस्र रुपयांपर्यंत विक्री !

दुप्पट-तिप्पट दर आकारून शालोपयोगी साहित्याची विक्री

अमरावती – शहरात सध्या पूर्व प्राथमिक नर्सरी (शिशूवर्ग) प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. शाळेचे प्रवेश अर्ज ५०० ते सहस्र रुपयापर्यंत विकले जातात. कायद्यानुसार शाळांनी प्रवेश अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असा नियम आहे; पण त्याचे पालन केले जात नाही. शहरातील चौका-चौकात चालू असलेली ‘प्ले हाऊस’ आणि ‘नर्सरी’ यांच्या दाखल्यासाठी प्रतीवर्षी किमान १० सहस्र ते लाखो रुपये मोजावे लागत आहेत.

शाळेने गणवेश, बूट, खेळाच्या तासिकेसाठी वेगळा गणवेश यांचे कमिशन दुकानांसाठी ठरवून दिले आहे. त्यामुळे त्या दुकानांत १०० रुपये किमतीचा शर्ट ३६० रुपयांपर्यंत विकला जातो. ३०० रुपयांचा गणवेश ७०० ते ९०० रुपयांना विकला जातो. १५०-२०० रुपयांचे बूट ३०० ते ४०० रुपये देऊन खरेदी करावे लागत आहेत.

डोनेशन (देणगी) ५ सहस्र ते १ लाख रुपये, पुस्तके ५ सहस्र ५८५ ते ८ सहस्र ९२५ रुपये, शाळेच्या ‘अ‍ॅप’साठी ४ सहस्र रुपये, सुरक्षेसाठी ३ सहस्र रुपये, शिकवणीवर्ग शुल्क २० सहस्र ते १ लाख ८८ सहस्र रुपये इतके अंदाजित शुल्क पालकांकडून वसूल केले जात आहे.

संपादकीय भूमिका 

शाळा प्रवेशाचा लुटारू बाजार ! शिक्षण विभाग आणि सरकार याकडे लक्ष देणार का ?