महाराष्ट्रात येणारा वायूप्रकल्प राज्याबाहेर कसा गेला ? याचे उत्तर उद्योगमंत्र्यांनी द्यावे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अंबादास दानवे

मुंबई – गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) आस्थापन मध्यप्रदेशमध्ये नवीन प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रात येणारा ५० सहस्र कोटी रुपयांचा हा प्रकल्प राज्याच्या बाहेर कसा गेला ? याचे उत्तर उद्योगमंत्र्यांनी द्यावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

१. ‘गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’कडून हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर आणि दाभोळ (रत्नागिरी) येथे उभारण्यात येणार होता. या प्रकल्पामध्ये प्रतिवर्षी १.५ दशलक्ष टन ‘इथेन क्रॅकिंग’ करण्यात येणार आहे. देशातील पेट्रोकेमिकल्सची मागणी पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाचे साहाय्य होणार आहे. गेल आस्थापनाकडून फेब्रुवारी मासात इथेन अधिक असलेल्या देशांकडून भारतात ते आयात केले जाईल, असे सांगण्यात आले होते.

२. मार्च महिन्यात ‘गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ने ‘ओ.एन्.जी.सी.’ आणि ‘शेल एनर्जी इंडिया’ यांसमवेत इथेन आणि अन्य हायड्रोकार्बन्स आयात करण्यासाठी सामंजस्य करार केला होता. प्रारंभी हा प्रकल्प महाराष्ट्रात होण्याची चर्चा होती; मात्र गेलने हा प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये होणार असल्याचे घोषित केले आहे.