त्रिंबक येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून गावातील ओहोळ स्वच्छ केला !

तहसीलदारांनी केले ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक

मालवण – तालुक्यातील त्रिंबक गावाचा पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला ओहोळ ग्रामस्थांनी श्रमदान करून झाडे, झुडपे आणि साचलेला गाळ यांपासून मुक्त केला. गावातील पाण्याची समस्या सुटावी, यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने राबवलेला हा उपक्रम वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येवर सर्वांना दिशादर्शक ठरणारा आहे.

त्रिंबक गावाच्या ३ बाजूंना डोंगर आहेत. या गावाच्या मध्यातून ओहोळ वहातो. एकूण ५ कि.मी. लांबीचा हा ओहोळ आहे. काही ठिकाणी याचे पात्र मोठे असून पावसाळ्यात नदीचे स्वरूप प्राप्त होते. गावच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला या ओहोळाचे पात्र झाडे, झुडपे आणि गाळ आदी कारणांनी बुजून गेले. काही ठिकाणी प्रवाहाची दिशा पालटली आहे. त्याचा परिणाम गावातील शेती, बागायती आणि पाण्याची उपलब्धता यांवरही झाला. त्यामुळे हा ओहोळ पुनर्जीवित करण्यासाठी सरपंच किशोर त्रिंबककर आणि संतोष त्रिंबककर यांच्या संकल्पनेतून ‘जागृत त्रिंबक’ या व्हॉटस्ॲप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ, तसेच मुंबईस्थित ग्रामस्थ यांचा चांगला सहभाग या ग्रुपमध्ये लाभला. सर्वांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर ग्रामस्थांची बैठक घेऊन ओहोळ पुनर्जीवित करण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्याला ग्रामस्थांनी पाठिंबा देत ओहोळ झाडे, झुडपे आणि गाळ मुक्त करण्याच्या श्रमदान अभियानाला प्रारंभ केला.

ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने राबवलेल्या या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वर्षा झालटे यांनी गावात भेट देऊन ओहोळाची पाहणी केली. या वेळी तहसीलदार झालटे यांनी, ‘गावातील शेतीसाठी आणि विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला ही गोष्ट अभिनंदनीय आहे. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यासाठी शासकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू’, असे आश्वासन या वेळी दिले.