मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांत उष्णतेच्या लाटेची चेतावणी !

२ दिवस उकाडा कायम रहाणार ! – हवामान विभाग

मुंबई – सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे, तर काही भागांमध्ये अवेळी पाऊस पडत आहे. पुढील ४८ घंट्यांत कोकणात आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात उष्णतेच्या लाटेची चेतावणी देण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात, तसेच ठाणे, पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहील. सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर येथेही उकाडा कायम रहाण्याची शक्यता आहे. दोन दिवस हा उकाडा कायम रहाणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वार्‍यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून अंदमान निकोबार बेटांवर आला आहे, असेही वृत्त आहे.