पूर्णगड येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खोटे दागिने ठेवून १८ लाख २१ सहस्र रुपयांची फसवणूक

तिघांवर गुन्हा नोंद

रत्नागिरी – तालुक्यातील पूर्णगड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ४४८.३०० ग्रॅम वजनाचे दागिने ठेवून १८ लाख २१ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील सोनार अमोल गणपति पोतदार, प्रभात गजानन नार्वेकर आणि पावस (रत्नागिरी) येथील अमेय सुधीर पाथरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील पतसंस्थेतील चोरीचा अन्वेषण चालू असतांना खोटे दागिने गहाण ठेवून त्याद्वारे कर्ज प्रकरण संमत करून फसवणूक करणार्‍या टोळीचा तपास पोलिसांना लागला होता.

या टोळीतील तिघांनी पूर्णगड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतही खोटे दागिने ठेवून कर्ज घेतल्याचे अन्वेषणात पुढे आले आहे. अमेय पाथरे, अमोल पोतदार आणि प्रभात नार्वेकर यांनी संगनमताने ४४८.३०० ग्रॅम वजनाच्या १३ चेन आणि २ ब्रेसलेट, असे दागिने गहाण ठेवून १८ लाख २१ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे.