मुंबई, २२ मे (वार्ता.) – महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील २ सहस्र ९४९ गावांतील ७ सहस्र ६२३ वाड्यांमध्ये सद्यःस्थितीत ३ सहस्र ६५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून येथे विविध ठिकाणी ६९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे.
२२ मे २०२३ या दिवशी ३९८ गावांमध्ये पाणीटंचाई होती. त्या तुलनेत या वर्षी ७ पटींनी पाणीटंचाईमध्ये वाढ झाली आहे. मराठवाड्यात १ सहस्र २४७ गावांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई आहे. राज्यात विदर्भामध्ये पाणीटंचाई अल्प आहे. विदर्भातील केवळ ११ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. कोकणातील ९१ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.
१० जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई नाही !
सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर, अकोला, वाशिम, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या १० जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई नाही.