विश्व हिंदु परिषदेच्या वतीने कणेरी मठ येथे संतसंमेलन उत्साहात !
कोल्हापूर – ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यांसह विविध समस्या सध्या हिंदूंसमोर आहेत. अचानक रावण, महिषासूर यांना आदर्श मानणारे लोक सिद्ध होत आहेत. ज्या ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या अल्प होत आहे, तो तो भाग असुरक्षित बनतो. ख्रिस्ती आणि मुसलमान संस्थांना विदेशातून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे यापुढील काळात हिंदूंनी देव, देश, धर्म यांचे कार्य व्यापक स्तरावर करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री श्री. मिलिंदजी परांडे यांनी केले. ते कणेरी मठ येथे आयोजित संतसंमेलनात बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विहिंपचे प्रांतसंघटनमंत्री श्री. संजय मुद्राळे, विश्व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील उपस्थित होते. स्वागत आणि आभारप्रदर्शन विभागमंत्री श्री. शिवजी व्यास यांनी केले.
या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदाय हा देशासाठी आदर्श आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसून वारकरी सर्वांना एकच समजतात. विश्व हिंदु परिषद-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कार्य देशभरात व्यापक स्वरूपात चालू असून त्यांच्या वनवासी कल्याणाच्या सेवाकार्यास तोड नाही. देव, देश, धर्म यांसाठी संघाचे अडीच लाखांपेक्षा अधिक प्रकल्प चालू आहेत.’’ |
या संमेलनासाठी विहिंपचे जिल्हामंत्री श्री. अनिल दिंडे, श्री. मिलिंद लिंबाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापूरे, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, प.पू. ईश्वरबुवा रामदासी, प.पू. मौनी महाराज यांसह सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील विविध संत, महंत, वारकरी संप्रदायांचे प्रमुख, हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. मिलिंदजी परांडे पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतर नागालँड, मिझोराम यांसारख्या राज्यांमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात धर्मांतरित झाल्याने या राज्यात हिंदु धर्मीय अल्पसंख्य झाले आहेत. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागांत धर्मांतराचे कार्य जोरात चालू आहे. यासाठी आपल्याला हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी लागेल.’’
भारत अखंड होण्याचा संकल्प परत एकदा करावा लागेल !
पूर्वी एकसंघ असलेला भारत आज खंडित झाला आहे. आपली अनेक शक्तीपिठे ही पाकिस्तान-बांगलादेश येथे आहेत. सिंधू नदी आपल्याकडे नाही. पाणिनीचे जन्मस्थान पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे हे परत मिळवायचे असेल, तर शास्त्र, सदाचार यांसोबत सामर्थ्य, शक्ती यांची उपासना आपल्याला करावी लागेल. जसा आपण श्रीराममंदिराचा संकल्प पूर्ण केला, त्याचप्रकारे यापुढील काळात आपल्याला भारत अखंड होण्याचा संकल्प परत एकदा करावा लागेल.
सातत्याने हिंदूंचा घटणारा जननदर ही चिंतेची गोष्ट !
भारतात हिंदूंचा जननदर हा १.९२ टक्के असून मुसलमानांचा जननदर हा २.३ टक्के इतका आहे. हिंदूंची संख्या सातत्याने घटत असून शहरी भागांमध्ये ‘हम दो-हमारा एक’, अशी स्थिती आहे. सैन्यामध्ये २१ सहस्र वरिष्ठ अधिकार्यांच्या जागा युवक मिळत नसल्याने रिक्त आहेत. त्यामुळे सातत्याने घटणारा हिंदूंचा जन्मदर ही चिंतेची गोष्ट आहे, असे मत श्री. मिलिंदजी परांडे यांनी व्यक्त केले.
जागृत होऊन संघटितपणे कृती करण्याची आवश्यकता ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी
केरळसारख्या राज्यात आज हिंदू अल्पसंख्य होत आहेत. समुद्रकिनारी असलेले हिंदु कोळी बांधव धर्मांतरित होत आहेत. संभाजीनगरजवळ असलेले एक पूर्ण गाव ‘वक्फ बोर्डा’ने त्यांची संपत्ती म्हणून घोषित केले. याला हिंदूंनी संघटितपणे विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला. हिंदु धर्मात आज काही संघटनांकडून विद्वेष पेरण्याचे काम चालू आहे. संत हे अखिल समाजासाठी काम करतात. दुर्दैवाने संतांनाही आज जातींमध्ये विभागण्याचे काम चालू आहे. अशा प्रकारे जातींमध्ये भांडणे लावणार्यांपासून आपण सावध झाले पाहिजे. देशात वर्षाला ४० सहस्र मुली गायब होत असून त्या कुठे जातात ? यावर कुणीही गांभीर्याने विचार करत नाही. त्यासाठी प्रत्येकाने जागृत होऊन संघटितपणे कृती करावी.’’
विविध मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत
या प्रसंगी विविध मान्यवरांनी धर्मकार्यात ते कशा प्रकारे योगदान देऊ शकतात ? तसेच ते कशा प्रकारे धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत ? या संदर्भात त्यांचे अनुभव, तसेच या संदर्भातील त्यांच्या सूचना केल्या. श्री. सुहास लिमये, श्री. मयुर कुलकर्णी, श्री. केसरकर, श्री. संजय खाडे, श्री. संग्रामसिंह खाडे यांसह अन्य मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी लिंगेश्वर (जिल्हा सांगली) येथील साध्वी जानकीमाताजी म्हणाल्या, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून सागरेश्वर अभयारण्य येथे असलेले श्रीराममंदिर हे वनक्षेत्रात असून तेथे उपासना करणे, पूजा करणे यांसह विविध धार्मिक कृती करतांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी यातून मार्ग निघण्यासाठी प्रयत्न व्हावेत.’’