मायक्रोप्लास्टिकमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम ! – संशोधन

(मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे छोटे कण !)

न्यू मेक्सिको (मेक्सिको) – ‘टॉक्सिकोलॉजिकल सायन्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात प्रत्येक मानवी अंडकोषात मायक्रोप्लस्टिक आढळून आले आहे. प्लास्टिक प्रदूषणाचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होणार्‍या संभाव्य परिणामांसंदर्भातील या शोधामुळे चिंता वाढली आहे. न्यू मेक्सिको विद्यापिठाच्या संशोधकांनी कुत्रे आणि मानव दोघांच्या ऊतींचे नमुने विश्‍लेषित केले अन् त्या सर्वांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले. या अभ्यासात ‘पुरुष प्रजननक्षमतेचे संभाव्य परिणाम’ ठळकपणे मांडले आहेत, जे पुढील तपासाला प्रवृत्त करतात.

१. ‘यू.एन्.एम्. कॉलेज ऑफ नर्सिंग’मधील प्राध्यापक जॉन यू यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने ४७ कुत्रे आणि २३ मानवी अंडकोष यांमध्ये १२ प्रकारचे मायक्रोप्लास्टिक्स शोधल्याचा अहवाल दिला.

२. यू म्हणाले की, अलीकडे प्रजनन क्षमतेत घट होत आहे, याचा तुम्ही विचार केला आहे का ? काहीतरी नवीन असले पाहिजे.

३. सर्वांत सामान्य प्रकारचे प्लास्टिक आढळते – ते म्हणजे ‘पॉलिथिलीन’, जे सामान्यतः प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांमध्ये वापरले जाते.

४. यू म्हणतात की, आरंभी मला शंका होती की, मायक्रोप्लास्टिक्स प्रजनन प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात कि नाही ? जेव्हा मला पहिल्यांदा कुत्र्यांचे निकाल मिळाले, तेव्हा मला आश्‍चर्य वाटले. जेव्हा मला मानवांसाठीचे निकाल मिळाले, तेव्हा आणखी आश्‍चर्य वाटले.

५. या संशोधनामुळे मायक्रोप्लास्टिक्स वातावरणात पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहेत, अगदी मानवी शरीराच्या अत्यंत संवेदनशील भागातही ते पोचतात, हे लक्षात येते. पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर मायक्रोप्लास्टिक्सचे नेमके काय परिणाम होतात ?, हे निश्‍चित करण्यासाठी पुढील संशोधनाची आवश्यकता आहे; परंतु या शोधामुळे सार्वजनिक आरोग्याची चिंता मात्र वाढली आहे.

संपादकीय भूमिका

  • मायक्रोप्लास्टिकमुळे आईच्या दूधावर विपरीत परिणाम होता, तसेच मानसिक स्वास्थ्यावरही त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो, असे संशोधन याआधी झाले आहे. आता पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होत असल्याने हे मनुष्यजातीसाठीच धोकादायक आहे. यावर परिणामकारक उपाय काढले गेले पाहिजेत !
  • मानव जसजसे विविध अत्याधुनिक शोध लावत आहे, तसतसे त्याचे जीवनमान खालावत चालले आहे. मायक्रोप्लास्टिकचा हा परिणाम त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. हे आधुनिक विज्ञानाचे मानवाला देणे आहे !