श्रेया धारगळकर यांना तडीपार करा ! – संतप्त ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी

  • श्री लईराईदेवीचे व्रतस्थ धोंड यांचा अवमान केल्याचे प्रकरण

  • डिचोली येथील संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा !

  • आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांचा ग्रामस्थांना पाठिंबा !

डिचोली, २० मे (वार्ता.) – फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान समिती आणि महाजन यांची सामाजिक माध्यमांत अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी भाविकवर्ग आणि महाजन यांच्यामध्ये जनक्षोभ उसळला आहे. यानंतर हा अवमान करणार्‍या श्रेया धारगळकर या महिलेने श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचे महाजन आणि भक्तगण यांची सार्वजनिकरित्या क्षमा मागितली. त्यानंतर आता श्रेया धारगळकर यांनी समाजिक माध्यमाद्वारे शिरगाव येथील श्री लईराईदेवीचे व्रतस्थ धोंड यांचाही अवमान केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे श्रेया धारगळकर यांच्या विरोधात डिचोलीतही जनक्षोभ उसळला आहे.

श्रेया धारगळकर

या प्रकरणी श्री लईराईदेवीचे डिचोली येथील व्रतस्थ धोंड आणि भाविक संतप्त झाले असून त्यांनी २० मे या दिवशी डिचोली पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन श्रेया धारगळकर यांना तडीपार करण्याची मागणी केली.

श्री लईराईदेवीचे डिचोली येथील व्रतस्थ धोंड आणि भाविक यांनी डिचोली पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची भेट घेतल्यानंतर नागरिकांच्या वतीने अधिवक्ता नार्वेकर यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर पत्रकारांना संबोधित केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान समिती आणि महाजन यांची सामाजिक माध्यमांत अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी श्रेया धारगळकर या सध्या कुंकळ्ळी पोलिसांच्या कह्यात आहेत. डिचोली पोलिसांनी श्रेया धारगळकर यांना लवकरच डिचोली येथे आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे. श्रेया धारगळकर यांच्या विरोधात भक्तगणांमध्ये तीव्र संताप आहे. त्यांनी देवी आणि व्रतस्थ धोंड यांच्यावर टीका केली आहे. आज आम्ही गप्प बसलो, तर उद्या दुसरी व्यक्ती असाच अवमान करील. त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही.’’

घटनेमागे षड्यंत्र असण्याची शक्यता !

म्हापसा येथे एका युवतीने श्री देवी लईराई यांच्याविषयी सामाजिक माध्यमांत अवमानकारक लिखाण नुकतेच प्रसारित केले होते. याविषयी म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी आम्हाला संबंधित युवती अल्पवयीन असल्याचे सांगितले; मात्र संबंधित युवतीचा जन्म एप्रिल २००६ मध्ये झाला असल्याचे आम्हाला तिच्या कागदपत्रावरून निदर्शनास आले. ती युवती १८ वर्षांची आहे, तरीही ती अल्पवयीन असल्याचे आम्हाला पोलिसांनी सांगितले. आम्ही त्या वेळी गप्प बसलो. म्हापसा येथे तक्रार नोंदवून घेण्यासही आम्हाला फार अडथळे आले. म्हापसा येथील घटना ताजी असतांनाच आता श्रेया धारगळकर या महिलेने व्रतस्थ धोंड यांचा अवमान केला आहे. या सर्व गोष्टींमागे षड्यंत्र आहे.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांचाही ग्रामस्थांना पाठिंबा !

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर उपस्थितांना संबोधित करतांना ग्रामस्थांच्या या आंदोलनाला सर्वतोपरी पाठिंबा दर्शवला. श्रेया धारगळकर यांना तडीपार करण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी या प्रकरणाचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहे. हे प्रकरण मुख्यमंत्र्यासमोरही मांडण्यात येणार आहे, असे दोन्ही आमदारांनी ग्रामस्थांना सांगितले.

अशासकीय संस्थांच्या नावे लोक धंदा चालवत आहेत ! – आमदार प्रेमेंद्र शेट

आमदार प्रेमेंद्र शेट

श्रेया धारगळकर यांनी आज सामाजिक सलोखा बिघडवला आहे. अशासकीय संस्थांच्या नावाखाली काही लोक धंदा चालवू लागले आहेत. अशा अशासकीय संस्थांना अनुमती कुणी दिली ? याचा शोध घेतला जाणार आहे. वेळप्रसंगी याविषयी विधानसभेत आवाज उठवू. वास्तविक अशासकीय संस्था समाजाच्या उद्धारासाठी असतात; मात्र काही अशा संस्था आता समाजाचे शोषण करू लागल्या आहेत. यांचे धंदे बंद झाले पाहिजेत. अशासकीय संस्थेच्या व्याख्येमध्ये पालट करण्यासाठी मी प्रयत्न करीन.