पाथर्डी (जिल्हा नगर)- राष्ट्रविकास आणि विश्वशांती यांसाठी महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर साहित्याचे आणि नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले. येथील जिरेसाळ गल्लीतील श्रीपिनाकेश्वर मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते. सद्गुरु शंकर महाराज मठाचे अधिपती प.पू. माधवबाबा यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे विधीवत् पूजन करण्यात आले. लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जिरेसाळ यांनी प्रास्ताविक करतांना समतावादी युगपुरुष महात्मा बसवेश्वरांची ९१९ वी जयंती आपण साजरी करतो आहोत, अशी माहिती दिली. श्री. राजेंद्र उदारे यांनी सूत्रसंचालन केले. बसवेश्वर जयंतीची महत्त्वपूर्ण दासोह सेवा श्री. सचिन फुटाणे यांनी केली. श्री. संजय चेलवे यांनी आभार मानले.
प्रवचन सोहळ्यास सर्वश्री प्रभाकर इजारे, सुहास शेळगावकर, पत्रकार विजय शिवगजे, संजय पैठणकर, सोन्याबापू मुदळ, नंदकुमार डाळिंबकर, सुनीलराव फळे, दत्ता होनमुने, बाळासाहेब जिरेसाळ, संतोष बुरसे, गजानन तारापुरे, विठ्ठलराव हंपे, सचिन साखरे, गणेश पैठणकर, संजय स्वामी, महेश फुलशेटे, शिवाजी कंगे, दत्तात्रय टेंभूरकर, गणेश जंगम, लखन जंगम, शुभम जिरेसाळ, सौ. सुरेखा शेटे, सौ. रेणुका फुलशेटे, सौ. रूपाली आगलावे यांच्यासह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक-युवतींची लक्षणीय उपस्थिती होती.
प्रवचन करतांना श्री. चवंडके पुढे म्हणाले, ‘‘वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया हा बसवेश्वरांचा जन्मदिन. श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी हा बसव पंचमी अशी ओळख असलेला लिंगैक्यदिन आहे. बसवकल्याण (जि. विजयपूर) ही त्यांची जन्मभूमी आहे. मंगळवेढा (जि. सोलापूर) आणि बसवकल्याण (जि. बिदर) या दोन्हीही कर्मभूमी आणि कुडलसंगम (जि. बागलकोट) ही लिंगैक्य भूमी आहे. या भूमीत नतमस्तक होतांना आजही स्फूर्ती मिळते.’’
चालुक्य आणि कलचुरी ही मध्ययुगीन भारतातील दोन प्रमुख राजघराणी होती. चालुक्य राजाची राजधानी कल्याण होती, तर मंगळवेढा ही कलचुरी राजाची राजधानी होती. इ.स. ११३२ ते ११५३ या २१ वर्षांच्या कालखंडात बसवेश्वरांनी मंगळवेढा राज्याची सत्तासूत्रे समर्थपणे सांभाळली. त्यानंतर त्यांनी कल्याण राज्याचे पंतप्रधानपद भूषवले. भारतीय प्रशासन व्यवस्थेतील ते पहिले पंतप्रधान ठरले. कल्याण येथे बसवेश्वरांनी ७०० पुरुष आणि ७० महिला सदस्य असलेली अनुभव मंटप ही जगातील पहिली लोकसभा-पहिली संसद निर्माण केली. मध्ययुगीन भारताच्या ऐतिहिसिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील महापुरुष असलेले महात्मा बसवेश्वर मध्ययुगीन भारताचे जनकच होत. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, शिक्षण, साहित्य, अर्थकारण, राजकारण आदी क्षेत्रांत बसवेश्वरांनी आपल्या मूलगामी आणि दूरगामी विचार कार्याचा भरीव ठसा उमटवला. लिंगायत धर्मियांनी आपल्या धर्मातील कोणत्याही जातीमध्ये विवाह करावा; मात्र धर्म पाळावा, हा त्यांचा विचार कल्याण क्रांतीची नांदी ठरला. कर्नाटक सरकारने लिंगायत धर्मास मान्यता दिली ते बसवेश्वरांचे कार्य समजून घेतल्यानेच !
व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणार्या मानवी सामाजिक मूल्यांचा दीपस्तंभ म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. त्यांचे वचन साहित्य जीवनतारक संदेश देणारे आणि आजच्या काळातही मार्गदर्शन करणारे आहे. कायकवे कैलास, दया धर्माचे मूळ, सदाचार हाचि स्वर्ग, अनुभव हाच गुरु ही त्यांच्या वचन साहित्यातील वाक्ये प्रेरणादायी आहेत. त्यांचे कार्य व्यापक, विविधांगी, क्रांतीकारक आणि सर्वसमावेशक आहे. कन्नड भाषेतील त्यांचे साहित्य तब्बल ९०० वर्षे कन्नड भाषेपुरतेच मर्यादित राहिले. बसव समितीने पुढाकार घेऊन ३४ भाषांमध्ये ते भाषांतरीत करण्याची कामगिरी बजावली. त्यात इंग्रजी, अरेबिक, पर्शियन, फ्रेंच, चिनी, नेपाळी, कोरियन आदी परकीय भाषांचाही समावेश आहे. आज इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पोलंड, दुबई, अमेरिका आदी ३५ देशांमध्ये बसवेश्वरांची जयंती साजरी होत आहे. बसवेश्वरांनी शिवोपासना, दया, दासोह, श्रमश्रेष्ठता, मातृभाषेमधून शिक्षण प्रसार, दीनोद्धार, स्त्रीधर्म स्वातंत्र्य अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार केला. बसवेश्वरांची ही लिंगायत संस्कृती घरा-घरांत श्रद्धेने जपली गेल्यास हिंदु राष्ट्र निर्मितीत ही शिवभक्त कुटुंबे निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करतांना आपण लिंगायत धर्मात जन्मलो याचा जीवनभर अभिमान बाळगून लिंगायत संस्कृतीचे जतन करा, असे आवाहनही श्री. चवंडके यांनी केले.