अंमलबजावणी संचालनालयाकडून ५२.७३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त !

‘रिअल इस्टेट समूह मोनार्क युनिव्हर्सल ग्रुप’चे मनी लाँड्रिंग प्रकरण

मुंबई – रिअल इस्टेट समूह मोनार्क युनिव्हर्सल ग्रुपच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग (पैशांची अफरातफर) प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने नवी मुंबईतील ५२.७३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या ग्रुपने अनेक प्रकल्पांसाठी खरेदीदारांना आमंत्रित केले होते, तसेच एका हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीला ब्रँड ॲम्बेसेडर (सदिच्छादूत) म्हणून नियुक्त केले होते.

१. या अभिनेत्रीची विज्ञापने पाहून अनेकांनी यात गुंतवणूक केली. बांधकाम व्यावसायिक गोपाल अमरलाल ठाकूर यांनी गुंतवणूकदारांकडून जमा केलेली मोठी रक्कम त्यांच्या विविध संलग्न आस्थापनांना हस्तांतरित केल्याचे ईडीच्या अन्वेषणात उघड झाले.

२. बांधकाम व्यावसायिकांनी फ्लॅट खरेदीदारांकडून पैसे घेऊन नोंदणी करून घेतली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांचे आस्थापन आणि संचालक यांच्यावर गंभीर गुन्हे नोंदवले. या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे.

३. ईडीच्या म्हणण्यानुसार, मोनार्क ग्रुप आणि संचालक यांनी एकच फ्लॅट अनेक जणांना विकला आणि ग्राहकांच्या माहितीविना आधीच विकलेले फ्लॅट गहाण ठेवून कर्ज घेतले. यात गोपाल अमरलाल ठाकूरला जुलै २०२१ मध्ये अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी ऑगस्ट २०२१ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

ग्राहकांची फसवणूक करणार्‍या संबंधित आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायला हवी !