प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन राज्यस्तरीय आध्यात्मिक पुरस्कार श्री. नारायण भाटे आणि श्री. मिलिंद चवंडके यांना घोषित !

  • डॉ. धर्मवीर भारती यांची सामाजिक पुरस्कारासाठी निवड

  • २३ मे या दिवशी शेवगांवला पुरस्कार प्रदान समारंभ

योगतज्ञ दादाजी वैशंपायन

नगर – प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय आध्यात्मिक पुरस्कार श्री. नारायण भाटे (पुणे) आणि श्री. मिलिंद चवंडके (अहिल्यादेवीनगर) यांना घोषित करण्यात येत आहे. डॉ. धर्मवीर भारती (लातूर) यांची सामाजिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून गुरुवार, २३ मे २०२४ या दिवशी दुपारी ४ वाजता शेवगांवमधील प.पू. दादाजी वैशंपायननगरमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला अन् क्रीडा संस्थेचे अध्यक्ष श्री. अर्जुनतात्या फडके आणि सचिव श्री. फुलचंद रोकडे यांनी दिली, तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्यास आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांसह भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, वर्ष २०१० पासून प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा प.पू. योगतज्ञ संत दादाजी वैशंपायन यांच्या जयंतीस संपन्न होत आहे. प.पू. दादाजी वैशंपायन यांनी हिमालयामध्ये राहून खडतर तपश्चर्या केली. अष्टसिद्धी प्राप्त असूनही ते सामान्यांप्रमाणे रहात असत. वर्ष १९२० मध्ये बुद्ध पौर्णिमेस नेरे (ता. पनवेल, जि. रायगड) या गावी त्यांचा जन्म झाला. वयाच्या शंभराव्या वर्षी म्हणजे २० मे २०१९ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. त्यांनी दैवी शक्तीच्या साहाय्याने दु:खी, कष्टी लोकांचे त्रास दूर केले. अंध, अपंग, मूकबधीर, गरजू विद्यार्थी, समाजसेवी संस्था, तसेच मंदिरांचा जिर्णोद्धार करणार्‍या आणि अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्‍या संस्थांना सढळ हाताने देणगी स्वरूपात ते साहाय्य करत असत. शेवगावमध्ये त्यांनी दत्त मंदिर उभारले. श्रद्धेने आणि निष्ठेने या क्षेत्री येणार्‍या भक्तांच्या मनोकामना निश्चित पूर्ण होतात, अशा अनुभूती अनेक जण घेत आहेत. दादाजींच्या जयंतीचे औचित्य साधून आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रांत योगदान देणार्‍यांना प्रतिवर्षी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या नावे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. विशेष म्हणजे पुरस्कारासाठी प्रस्ताव न मागवता सातत्यपूर्ण निरपेक्ष कार्याची प्रत्यक्ष पहाणी करून निवड केली जाते.

श्री. नारायण भाटे

यावर्षीच्या आध्यात्मिक पुरस्कारासाठी पुणे येथील श्री स्वामीसमर्थ कृपांकित श्री. नाना भाटेकाका आणि नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांची निवड करण्यात आली. श्री. भाटेकाकांनी स्वामी समर्थांच्या सुरेख मूर्ती सहस्रो स्वामीभक्तांना भेट देण्याचे कार्य करतांना संजीवनी स्वामीकृपेची ही बखर आणि स्वामी वरद हा स्वामीभक्तांच्या अनुभवांचा अंक प्रकाशित करून स्वामीकृपेच्या अनुभूती आजही भक्तांना येत असल्याचे दाखवून दिले आहे. अंधश्रद्धा नसावी मात्र श्रद्धा असावी, हे सांगणारे भाटेकाका सहस्रो स्वामीभक्तांचे प्रेरणास्थान आहेत.

श्री. मिलिंद चवंडके

श्री. मिलिंद चवंडके यांनी श्रीक्षेत्र मढी येथील प.पू. श्रीकानिफनाथ संजीवन समाधी देवस्थानचे विश्वस्तपद भूषवतांना गर्भगिरीतील पहिल्या नाथ संमेलनाचे आयोजन करून अध्यात्मिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.|श्री कानिफनाथ माहात्म्य या शुद्ध मराठीतील ओवीबद्ध रसाळ पोथीचे लेखन केले. या पोथीची पहिली १००० पोथ्यांची आवृत्ती अवघ्या २७ दिवसांत संपली. ९३ दिवसात नर्मदेची पायी परिक्रमा पूर्ण करतांना आश्रम-मठ-मंदिर येथील साधू-संत-महंत आणि तपस्वींच्या दिव्य सान्निध्यात ते राहिले. आध्यात्मिक पत्रकारितेचे व्रत घेऊन गेली ३२ वर्षे व्रतस्थासारखे कार्यरत राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारात ४० वर्षे विविध दायित्व सांभाळले. या एकूण कार्याची दखल घेऊन आध्यात्मिक पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

डॉ. धर्मवीर भारती

डॉ. धर्मवीर भारती हे लातूर येथील निश्चल पुरी फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बांधकाम व्यवसाय क्षेत्रात डॉक्टर पदवी संपादन केली आहे. गेल्या १३ वर्षांपासून ते प्रतिवर्षी १५६ विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतात. २१ जोडप्यांचे सामुदायिक विवाह त्यांनी केले. तीन गोशाळा उभारून भारतीय गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनाचे मौलिक कार्य चालू ठेवले आहे. आपण जे कमवतो त्यातील १० टक्के भाग सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यासाठी निश्चल पुरी फाऊंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत.

नाशिक येथील प.पू. गजानन कस्तुरे आणि मुंबई येथील एम्.एस्.डी.एल्. वित्त विभागाचे संचालक श्री. अनुदीप दिघे यांच्या हस्ते हे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या सोहळ्यास आ. मोनिकाताई राजळे, माजी आ. चंद्रशेखर घुले, रिलायन्स ट्रस्टचे व्हाईस प्रेसिडेंट गणेश राममूर्ती, तहसिलदार प्रशांत सांगडे, शरदकाका वैशंपायन, प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल (बीड), उदयकाका देशपांडे (नाशिक), रवींद्र पुसाळकर, प्रशांत दिघे (मुंबई), सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित रहाणार आहेत, तसेच पं.स.चे मा. सभापती अरुण लांडे, पाथर्डीचे नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे, शेवगाव बाजार समितीचे सभापती संजय फडके, ॲड्. विजयराव काकडे, सुनील रासने, महेश फलके हे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.