अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करण्याचे महत्त्व, उद्देश अन् शास्त्र !
१. महत्त्व
‘उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.
२. उद्देश
अ. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा तर्हेने स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर आणि देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे.
आ. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने त्या आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.
इ. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.
३. शास्त्र
अक्षय्य तृतीयेदिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील, तसेच सत्त्व-रज लहरींचा प्रभाव जास्त प्रमाणात असल्याने या लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी अन् मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने या कधीही क्षय न होणार्या लहरींच्या प्रभावाच्या साहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते; म्हणून उदककुंभरूपी सर्वसमावेशक स्तरावर सर्व पापांचे हरण करून त्यांना सामावून घेणार्या पात्ररूपी दानाला या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने लिखाण करतात.)
१. ‘अक्षय्य तृतीया’ हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्यामुळे त्या दिवशी वातावरणात चैतन्य असते.
२. उदककुंभ दान देण्याचे महत्त्व : ‘अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उदककुंभ ब्राह्मणाला दान देण्याच्या कृतीमुळे त्याग होतो. त्यामुळे स्वतःची आसक्ती आणि वासना लोप पावतात, तसेच पितरांच्या अतृप्त इच्छांची पूर्ती झाल्यामुळे त्यांच्यावरील अतृप्त इच्छांचे आवरण दूर होते आणि त्यांना गती प्राप्त होते. म्हणजे ते पुढील लोकांत प्रवास करतात.’ – सौ. प्रियांका गाडगीळ, डोंबिवली
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवतांचे पूजन केलेला उदककुंभ ब्राह्मणाला दान देण्याच्या प्रक्रियेचे सूक्ष्म चित्र !
उदककुंभ ब्राह्मणाला दान देतांना झालेली सूक्ष्मातील प्रक्रिया !
१. ‘अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी वातावरणात चैतन्य कणांच्या रूपात अस्तित्वात असणे
२. व्यक्ती देवतेसाठी ठेवण्यात आलेल्या उदककुंभांचे पूजन करतो त्या वेळी व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी भावाचे वलय निर्माण होणे
३. व्यक्तीचे ईश्वराशी अनुसंधान होणे
४. पूजन करण्यात आलेल्या उदककुंभात ईश्वराकडून शक्तीचा प्रवाह आकृष्ट होणे
५. उदककुंभात शक्तीचे वलय निर्माण होणे आणि ते कार्यरतरूपात फिरणे
या उदककुंभात असणार्या सवात, सुपारी आणि जल यांमुळे देवतेकडून आकृष्ट झालेल्या लहरी उदककुंभात सामावून रहाणे
६. ईश्वराकडून चैतन्याचा प्रवाह उदककुंभात आकृष्ट होणे
७. उदककुंभात चैतन्याचे वलय निर्माण होणे आणि या वलयातून वातावरणात चैतन्याच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होणे
८. उदककुंभाचे पूजन करणार्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्त्वप्रधान वलय निर्माण होणे : देवतांचे पूजन करून देवतातत्त्वाने भारीत झालेल्या या कलशाचे दान करण्यास सांगितले आहे यावरून हिंदु धर्म हा त्यागात आनंद आहे आणि भोगात केवळ सुख आहे, हे शिकवतो या ठिकाणी दान देण्याच्या या कृतीतून व्यक्तीची आसक्ती अल्प होत असल्याचे जाणवले.
९. निर्माण झालेल्या सत्त्वप्रधान वलयातून सत्त्वप्रधान प्रवाह दान स्वीकारण्यात येणार्या ब्राह्मणाच्या दिशेने प्रक्षेपित होणे
१०. दान स्वीकारणार्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्त्वप्रधान वलय निर्माण होणे
११. दान देणार्या व्यक्तीवर उपाय होऊन देहावरील काळे आवरण दूर होणे
१२. व्यक्तीभोवती संरक्षक कवच निर्माण होणे
१३. ईश्वराकडून आशीर्वादाचा प्रवाह व्यक्तीकडे आकृष्ट होणे’
– सौ. प्रियांका गाडगीळ, डोंबिवली
अक्षय्य तृतीयेला देवता आणि पितर यांना केल्या जाणार्या ‘उदककुंभ दान विधी’च्या वेळी करावयाचा संकल्प !
‘श्रीपरमेश्वरप्रीतिद्वाराउदकुम्भदानकल्पोक्तफलावाप्त्यर्थं ब्राह्मणाय उदकुम्भदानं करिष्ये ।
अर्थ : श्रीपरमेश्वराच्या प्रीतीरूप कृपाप्रसादामुळे उदककुंभदानाचे कल्पसूत्रादी धर्मशास्त्रांत जे काही फळ सांगितले आहे, त्या फळाच्या प्राप्तीकरता मी ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करत आहे.’
याप्रमाणे संकल्प करून सूत्राने वेष्टिलेल्या गंध, फूल, यव इत्यादींनी युक्त अशा कलशाची आणि त्याचप्रमाणे ब्राह्मणाची पंचोपचार पूजा करावी. पुढील मंत्रांनी ब्राह्मणाला कलशाचे दान द्यावे.
‘एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ॥
गन्धोदकतिलैर्मिश्रं स्नानं कुम्भफलान्वितम् ।
पितृभ्यः संप्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ॥
अर्थ : हा धर्मघट (उदककुंभ) जो मी पितरांना दिला आहे, तो साक्षात् ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे स्वरूप आहे. याच्या दानामुळे माझे (जीवित वा मृत) मातापिता, तसेच आजोबा इत्यादी पितरही तृप्त होवोत. तीळमिश्रित गंधोदकाचे (चंदनादी सुगंधी द्रव्याने युक्त अशा पाण्याचे) कुंभदानाच्या फळाने युक्त असे स्नान मी पितरांना अर्पण करत आहे. ते सदैव अक्षय (क्षयविरहित) रहावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’
(साभार :‘धर्मसिंधु’, पृष्ठ क्र. ७२)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या हातातील दाणे ओंजळीत घातल्यावर साधनारूपी दाण्यांची अमूल्य भेट मिळाल्याचे वाटून अष्टसात्त्विक भाव जागृत होणे
‘२६.४.२०२० या दिवशी अक्षय्य तृतीया असल्याने मी सकाळी ११ वाजता देवद आश्रमातील ध्यानमंदिरात बसलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मला सूक्ष्मातून दर्शन झाले. त्यांनी निळ्या रंगाचा सदरा आणि विजार परिधान केली होती. त्यांच्या हातात दाण्यांनी भरलेले सूप होते. त्यांनी मला हातांची ओंजळ करायला सांगितली आणि त्या सुपातील दाणे माझ्या ओंजळीत घातले. ते म्हणाले, ‘तुम्हाला माझ्याकडून भेट !’ तेव्हा त्यांनी ‘जणू साधनारूपी दाण्यांची अमूल्य भेट मला दिली आहे’, असे वाटून माझा अष्टसात्त्विक भाव जागृत झाला. मला अश्रू आवरेना. मी भानावर आलो. तेव्हा ११.३० वाजले होते. अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला दिलेल्या या भावभेटीसाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. मिलिंद खेर, रत्नागिरी (२६.४.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र असे म्हणतात. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
अक्षय्य तृतीयेला भावपूर्ण उदककुंभ दान करून देवता आणि पितर यांची कृपा संपादा ! |