Children abused by Pakistan Army: पाक सैन्यदलातील अधिकार्‍यांकडून मुलांचे लैंगिक शोषण !

१०० मुलांचे ६०० व्हिडिओ प्रसारित

इस्लामाबाद – पाकिस्तानी सैन्यदलाच्या खैबर पख्तूनख्वाच्या आदिवासी भागात तैनात असलेल्या अधिकार्‍यांनी अनेक मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी १०० मुलांचे ६०० हून अधिक व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. या मुलांचे वय १४ वर्षांपेक्षा अल्प असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी कमांडर लेफ्टनंट जनरल हसन अझहर हयात यांनी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चा आदेश दिला आहे. पोलिसांनी या भागातील दुकानदार ताहिर कबाडी याला लैंगिक शोषण प्रकरणात अटक केली आहे.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताहिर कबाडी हा सैन्यदलाच्या जवळचा होता. तो सैन्यदलाच्या अधिकार्‍यांना गरीब मुलांचा पुरवठा करत असे. तो लहान मुलांना प्रलोभन देऊन अधिकार्‍यांकडे पाठवत असे, तसेच लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओही बनवत असे. तो मुलांच्या पालकांकडून पैसेही उकळत असे.

२. खुर्रमच्या स्थानिक लोकांचा आरोप आहे की, सैन्यदलाच्या काही अधिकार्‍यांवर यापूर्वीही लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते; मात्र पाकिस्तानी सैन्यदलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी पोलिसांवर दबाव आणून आरोपींना सोडवले होते.