अमेठी – येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर ५ मेच्या मध्यरात्री काही अज्ञातांनी आक्रमण केले. आक्रमणकर्त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड केली. या घटनेनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंगल पक्षाच्या कार्यालयात पोचले. या घटनेचा निषेध करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराचे मुख्य अधिकारी मयंक द्विवेदी यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळाला भेट दिली आणि आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘या घटनेचे अन्वेषण करून या घटनेला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई केली जाईल’, असे आश्वासन द्विवेदी यांनी दिले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अमेठीत काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. किशोरीलाल शर्मा हे गांधी कुटुंबाच्या अगदी जवळचे मानले जाते.