‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्ती मनोरंजनाच्या शोधात असते. अशा वेळेस चित्रपट पहाणे, हे मनोरंजनाचे मुख्य साधन बनले आहे. काही लोक केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट पहातात, तर काही लोक आवड म्हणून चित्रपट पहातात. चित्रपटाचे अनेक प्रकार आहेत, उदा. विनोदी चित्रपट, मूकपट, भयपट, भक्तीपट, काल्पनिक चित्रपट इत्यादी. व्यक्ती ज्या प्रकारचा चित्रपट पहाते, त्या प्रकारच्या स्पंदनांचा परिणाम तिच्यावर होत असतो. व्यक्तीने भयपट (भीतीदायक दृश्ये असणारा चित्रपट) पाहिल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाने व्यक्ती, वस्तू आणि वास्तू यांच्यामधील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येते.
१. चाचणीतील निरीक्षणे
या प्रयोगात ४ व्यक्तींनी भयपट पहाण्यापूर्वी आणि पाहिल्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणे पुढे दिली आहेत.
टीप – सध्याचा काळ रज-तमप्रधान असल्याने व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांच्यावर रज-तमात्मक (त्रासदायक) स्पंदनांचे आवरण येते. त्यामुळे चाचणीतील आध्यात्मिक त्रास नसलेल्या व्यक्तींमध्येही काही प्रमाणात त्रासदायक स्पंदने आढळून आली. या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होण्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन स्वतःवरील आवरण अधून-मधून काढणे आवश्यक आहे. आवरण काढण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग करू शकतो, उदा. विभूती लावणे, गोमूत्र शिंपडणे, स्तोत्र म्हणणे किंवा ऐकणे, नामजप करणे इत्यादी.
२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि निष्कर्ष
अ. भयपट पाहिल्यानंतर चारही व्यक्तींमधील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ वाढली आणि सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ उणावली. यातून ‘भयपट पाहिल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतात’, हे स्पष्ट झाले.
आ. हा नकारात्मक परिणाम आध्यात्मिक त्रास नसणार्या व्यक्तींच्या तुलनेत तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या व्यक्तींवर अधिक प्रमाणात झाला.
इ. दुसर्या दिवशीही सर्वांवर हा नकारात्मक परिणाम टिकून होता; पण त्याचे प्रमाण निरनिराळे होते.
निष्कर्ष : व्यक्तीने भयपट पहाणे कोणत्याही व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक आहे.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. भयपट पाहिल्याचा चाचणीतील सर्वांवर (त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर) नकारात्मक परिणाम होण्याचे कारण : भयपटातून प्रक्षेपित झालेल्या त्रासदायक स्पंदनांमुळे चाचणीतील सर्वांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण वाढले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली आणि सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली. या सर्वांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर झालेला नकारात्मक परिणाम दुसर्या दिवशीही टिकून होता; पण त्याचे प्रमाण निरनिराळे होते.
३ आ. आध्यात्मिक त्रास नसणार्या व्यक्तींच्या तुलनेत तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या व्यक्तींवर अधिक प्रमाणात नकारात्मक परिणाम होण्याची कारणे
१. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या व्यक्तींमध्ये त्यांच्या त्रासामुळे मूलतः नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात आढळली. भयपटातून प्रक्षेपित झालेली त्रासदायक स्पंदने त्यांना त्रास देणार्या वाईट शक्तींनी अधिक प्रमाणात ग्रहण केल्याने त्यांच्यातील (तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या व्यक्तींतील) नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ वाढली आणि दुसर्या दिवशीही तिचे प्रमाण फारसे उणावले नाही. याउलट आध्यात्मिक त्रास नसणार्या व्यक्तींमध्ये आरंभी अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली. भयपटातून प्रक्षेपित झालेल्या त्रासदायक स्पंदनांचा त्यांच्यावर तात्कालिक परिणाम झाला; म्हणून त्यांच्यातील नकरात्मक ऊर्जा वाढली; पण दुसर्या दिवशी ती उणावली.
२. व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळण्यामागे तिचे मनोबल, आत्मबळ आणि तिच्यातील सात्त्विक स्पंदने हे पैलू असतात, तसेच व्यक्तीमधील न्यून झालेली सकारात्मक ऊर्जा पुन्हा वाढण्यामागील कारण तिची त्रासदायक स्पंदनांविरुद्ध असणारी प्रतिकारक्षमता आहे. आध्यात्मिक त्रास नसणार्या व्यक्तींमध्ये वरील सर्व पैलू मूलतः असल्यामुळे भयपट पाहिल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ न्यून झाली; परंतु दुसर्या दिवशी (भयपट पाहिल्याच्या १ दिवसानंतर) ती पुन्हा वाढली. याउलट तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या व्यक्तींमध्ये त्यांना असलेल्या तीव्र त्रासामुळे मनोबल, आत्मबळ आणि त्रासदायक स्पंदनांविरुद्ध असणारी प्रतिकारक्षमता अल्प असते. त्यामुळे भयपट पाहिल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ न्यून झाली आणि दुसर्या दिवशी ती आणखी उणावली.
थोडक्यात ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असो किंवा नसो; पण तिच्यावर त्रासदायक स्पंदनांचा नकारात्मक परिणाम हा होतोच, केवळ त्याचे प्रमाण अल्प-अधिक असते’, हे लक्षात घेऊन त्रासदायक स्पंदने निर्माण करणार्या भयपटासारख्या गोष्टींपासून दूर रहाणे व्यक्तीसाठी हितावह आहे.’ (७.४.२०२४)
– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
इ-मेल : http://[email protected]
|