Narendra Modi TV9 Interview : समान नागरी कायदा आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध ! – पंतप्रधान

गोव्यात समान नागरी कायदा असून तेथे कुठली समस्या नसल्याचाही दिला  संदर्भ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – समान नागरी कायद्याच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांना मी सांगतो, जरा गोव्याकडे पहा. देश स्वातंत्र झाला, तेव्हापासून तिथे समान नागरी कायदा आहे. गोव्यात सर्वाधिक अल्पसंख्यांक आहेत. तरीही गोव्यात कसलीच समस्या नाही. सर्व जण सुख-समाधानाने रहात आहेत. गोवा वेगाने विकास करत आहे. त्यामुळे सर्व राज्यांना आज वाटत की, जर समान नागरी कायद्यामुळे गोव्यात सुखसमाधान आहे, तर आपल्या राज्यात का नाही ? त्यामुळेच समान नागरी कायदा आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याविषयी मांडलेली सूत्रे !

१. समान नागरी कायदा लागू व्हावा, हे राज्यघटनेतच लिहिले आहे !

समान नागरी कायदा लागू व्हावा, हे राज्यघटनेतच लिहिले आहे; मात्र अद्याप हा कायदा लागू करण्यात आला नाही. त्यामुळे ज्यांनी हा कायदा लागू केला नाही, त्यांना प्रश्‍न विचारले पाहिजे. देश चालवायचा आहे, तर देशात समान नागरी कायदा असावा कि नसावा?

२. मागील सरकारांनी कायदा का केला नाही ?

‘समान नागरी कायदा लागू कधी करणार?’ हा प्रश्‍न प्रसारमाध्यमे आम्हाला विचारत आहेत. मला आश्‍चर्य वाटते. प्रसारमाध्यमांनी हा प्रश्‍न ७५ वर्षानंतर का विचारला ? याआधी का विचारला नाही ? देश स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रत्येक सरकारला आणि पंतप्रधानांना हा प्रश्‍न विचारायला हवा होता.

३. काँग्रेसकडेच उत्तर मागा !

सर्वोच्च न्यायालयाने २ सहस्र ५०० वेळा गाजावाजा करून सांगितले की, सरकारने समान नागरी कायदा होण्यासाठी पावले उचलली पाहिजेत; म्हणून तुम्ही काँग्रेसकडेच यासंदर्भातील उत्तर मागितले पाहिजे.

४. सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करणार !

आम्ही सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करणार, हे आम्ही आमच्या घोषणापत्रांमध्ये सांगत आलो आहोत. आता त्यावर कशा पद्धतीने पुढे जायचे ?, कसा मार्ग काढायचा ?, हे आपण परिस्थितीनुसार ठरवत आहोत. देशाची राज्यघटना समान नागरी कायद्याविषयी बोलत आहे. देशातील सर्वोच्च न्यायालय या कायद्याविषयी बोलत आहे. देशातील घटनात्मक संस्थांनी जे सांगितले, ते करण्याचा आम्ही मार्ग शोधत आहोत. त्यामुळे आम्ही जनतेचे आशीर्वाद मागत आहोत.