नवी मुंबई – महापालिकेच्या शाळेतील शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ची सहल घडवली जाणार होती; मात्र शैक्षणिक वर्ष संपून विद्यार्थ्यांना सुट्या लागल्या तरी या सहलीला मुहूर्त मिळालेला नाही. शिक्षण विभागाअंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेतील नवी मुंबई महापालिकेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना बेंगळुरूतील ‘इस्रो’ अर्थात् भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची सहल घडवून आणण्याचा निर्णय महापालिकेने २ वर्षांपूर्वी घेतला होता. यासाठी शिष्यवृत्ती मिळालेल्या ३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. फेब्रुवारीत ही सहल निघणार होती. त्यासाठी महापालिकेने निविदाही मागवली होती.