Domestic violence in Australia: घरगुती हिंसाचार हे ‘राष्ट्रीय संकट’ ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात देशभरात सहस्रो लोकांनी मोर्चे काढल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घरगुती हिंसाचाराचे वर्णन ‘राष्ट्रीय संकट’ म्हणून केले आहे. २ कोटी ७० लाख लोकसंख्या असलेल्या देशात लिंग-आधारित हिंसाचारामुळे या वर्षी आतापर्यंत २७ महिलांचा मृत्यू झाला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी ऑस्ट्रेलियातील १७ शहरांमध्ये सहस्रावधी लोकांनी मोर्चे काढले. ऑस्ट्रेलियातील सर्व स्तरांवरील सरकारांनी लिंग-आधारित हिंसाचार रोखण्यासाठी कृती करण्याच्या आवाहनापोटी हे मोर्चे काढण्यात आले आहेत, असे पंतप्रधान अल्बानीज यांनी सांगितले. ‘या प्रकरणी आम्हाला बरेच काही करणे आवश्यक आहे. केवळ सहानुभूती व्यक्त करणे पुरेसे नाही’, असेही अल्बानीज या वेळी म्हणाले.

‘प्रत्येक चार दिवसांनी एका महिलेचा तिच्या जोडीदाराच्या हातून मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे’, असे पंतप्रधान म्हणाले. या प्रकरणी तोडगा काढण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील राज्ये आणि प्रदेश यांच्या नेत्यांची एक बैठक लवकरच घेण्यात येईल, असे अल्बानीज यांनी सांगितले.