अहिल्यानगर येथील दुय्यम कारागृहात बंदीवानांना विशेष सुविधा मिळत असल्याची माहिती !

मद्य, भ्रमणभाष, अमली पदार्थ पुरवल्याचा आरोप, प्रशासनावर प्रश्नचिन्ह !

प्रतिकात्मक चित्र

अहिल्यानगर – येथील कोपरगाव शहरात असलेल्या दुय्यम कारागृहात काही बंदीवानांना मद्य, भ्रमणभाष, अमली पदार्थांसह ‘व्हीआयपी’(महनीय व्यक्तींसाठीच्या) सुविधा मिळत असल्याची माहिती कारागृहातील काही बंदीवानांकडून मिळाली आहे. कोपरगाव तहसील कार्यालयाच्या जवळ असलेल्या दुय्यम कारागृहाचे नुकतेच नूतनीकरण झाले असून प्रत्येक ‘बरॅक’मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. असे असतांनाही विविध गंभीर गुन्ह्यांतील बंदीवानांकडे भ्रमणभाष असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमधून पोलीस आणि कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा प्रकार गंभीर असून खरेच कारागृहात अशा प्रकारच्या ‘व्हीआयपी’ सुविधा आरोपींना मिळत आहेत का ? याची चौकशी वरिष्ठ प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे. (असे सांगावे का लागते ? प्रशासनाला हे समजत कसे नाही ? – संपादक)

मागील वर्षी कारागृहामध्ये विविध अमली पदार्थ आढळले होते आणि त्या वेळी तत्कालीन पोलीस अधिकार्‍याने सदर प्रकरण दाबले असल्याचीही चर्चा आहे. कारागृहात अमली पदार्थांसह ‘व्हीआयपी’ सुविधा उपलब्ध होत असेल, तर हे पुरवतो तरी कोण ? याची माहिती पोलीस आणि कारागृह प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कारागृहात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे साहाय्य प्रशासनाने घ्यावे.