पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या सर्व मंदिरांची पुनर्बांधणी करणार असल्याची घोषणा
पणजी, १ मे (वार्ता.) : डॉ. कालिदास वायंगणकर हे अपक्ष या नात्याने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत. उच्च विद्याविभूषित असलेले डॉ. कालिदास वायंगणकर यांनी नुकतेच निवडणूक घोषणापत्र प्रसारित केले आहे.
घोषणापत्रात पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या गोव्यातील सर्व मंदिरांची पुनर्बांधणी करणे, प्रत्येक तालुक्यात मोकाट गुरांसाठी गोशाळा उभारून रस्त्यावरील अपघातांना आळा घालणे, प्रत्येक मतदारसंघात गुरुकुलाची स्थापना करणे, आध्यात्मिक केंद्र (दक्षिण काशी) या नात्याने गोव्याचे नाव प्रचलित करणे, सर्व शाळांमध्ये विनामूल्य शिक्षण देणे, सर्व सार्वजनिक सुविधा ‘ऑनलाईन’ उपलब्ध करून भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि कोमुनिदाद भूमीचे संरक्षण करणे या सूत्रांच्या समावेश आहे. ‘नागरिकांनी भरघोस मतदान करून आपणास निवडून द्यावे’, असे आवाहन डॉ. कालिदास वायंगणकर यांनी केले आहे.