श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

‘काही जिल्ह्यांतून रामनाथी आश्रमात आलेल्या अध्यात्मप्रसाराची सेवा करणार्‍या काही साधकांशी २९.९.२०२३ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अनौपचारिक संवाद साधला. त्या वेळी साधकांनी त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी साधकांना दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवलेली साधना (गुरुकृपायोगानुसार साधना) कुठल्याही वयात आणि कुठल्याही स्थितीत करता येणे

१ अ. पहिली साधिका : मला स्वत:कडून पुष्कळ अपेक्षा असतात, उदा. मला पूर्वीसारखी सेवा जमायला हवी; पण त्यासाठी कृतीच्या स्तरावर माझे प्रयत्न होत नाहीत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : काही शारीरिक अडचणी आहेत का ?

पहिली साधिका : हो आहेत. तसेच मला पूर्वीसारखे कष्ट करणे, आता जमत नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : इथे आश्रमात काय शिकलात ? काय करायला हवे ?

पहिली साधिका : गुरु सामर्थ्य पुरवणार आहेत. श्रद्धा ठेवून प्रयत्न करायला हवेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : मनात अपेक्षा असतील, तर आपण जे करतो, त्याचा आनंद घेऊ शकत नाही. साधना आनंदप्राप्तीसाठी आहे. आताच्या स्थितीत जे शक्य आहे, ते करा. यासाठी स्वयंसूचना घ्या. ‘मला जमत नाही’, असा नकारात्मक विचार नको. आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवलेली साधना कुठल्याही वयात आणि कुठल्याही स्थितीत करू शकतो.

२. इतरांना पालटणे शक्य नसल्याने परिस्थिती स्वीकारून प्रयत्न केल्यास मनाला त्रास न होणे

कु. मेघा चव्हाण

२ अ. दुसरी साधिका : आम्ही काही साधिका एकमेकींच्या सहकार्याने सेवा करतो; पण कधी सहकार्य मिळाले नाही, कुणी सोबत यायला नसेल, तर सेवा खंडित होते. मी सहसाधिकेला ‘तुमच्या वेळेनुसार सेवेला जाऊ’, असे सांगते; पण तसे होत नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : यात तुमच्या मनाची अडचण सोडवायला हवी. आपण इतरांमध्ये पालट करू शकत नाही. ईश्वराला काय अपेक्षित आहे ? त्या साधकांची स्थिती समजून घेऊन तुम्ही जे करू शकता, ते तुमच्या सेवेचे दायित्व असणार्‍या साधकांना विचारून करू शकता. परिस्थिती स्वीकारून पुढे चला. परिस्थिती बदलणे, ही साधना नाही. समजून घेऊन केले, तर मनाला त्रास होत नाही. शेवटी प्रसार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत !

३. साधकांनी साधनेचे प्रयत्न,म्हणजेच व्रत करण्यासंदर्भात केलेले मार्गदर्शन

३ अ. तिसरी साधिका : ‘साधकांनी आता साधनेचे प्रयत्न, म्हणजे एक व्रतच घ्यायचे’, असे शिबिरात सांगितले. मीसुद्धा साधनेचे तसे व्रत घेतले. शिबिरानंतर मी आश्रमात सेवेनिमित्त थांबले. ‘आता काही दिवसांनी जिल्ह्यात परत जाणार आहे. ‘तिथे गेल्यावर प्रयत्न होतील का ? माझे आतून तेवढे बळ नाही’, असे माझ्या मनात विचार येत होते; पण आता तुम्ही सांगितल्यानुसार मी ‘जिल्ह्यात गेल्यावर काय प्रयत्न करायचे ?’, त्याचे नियोजन करीन.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

अ. मन आहे, तोपर्यंत मनाचे कार्य चालू रहाणार. त्यात शंका, विचार, प्रतिक्रिया सर्व येतात. ‘आपली साधना काय ? त्या विचाराला मी योग्य दृष्टीकोन दिला का ? येणार्‍या शंका मी विचारून घेतल्या का ?’, हे पहायचे.

आ. आनंद हा फलप्राप्तीमध्ये नाही, तर तो निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आहे. असे प्रयत्न करत राहिलो, तर ‘फळ कधी मिळाले ?’, हे लक्षातही येणार नाही.

इ. या वर्षीच्या शिबिरात सांगितले की, सर्वजण सेवा करतात; पण व्यष्टी प्रयत्नांत सवलत घेतात. आता व्रत म्हणून प्रयत्न करण्यास सांगितले आहे. प्रयत्नांत खंड पडू नये, यासाठी शिक्षापद्धतीचा अवलंब करावा.

ई. वेळापत्रक करून आणि ध्येय ठेवून प्रयत्न करायचे अन् आढावा द्यायचा. दिवसांतून ३ वेळा स्वत:चा आढावा घ्यायचा. तेव्हा ‘ईश्वरप्राप्तीसाठी मी काय केले ? कुठे कमी पडले ?’, हे पहायचे. एक-एक दिवस अमूल्य आहे. तो वाया घालवू नका. ज्यांना व्यष्टी साधनेचे प्रयत्न करावेसे वाटत नाहीत, त्यांनी त्यासाठी स्वयंसूचना द्याव्या. (क्रमश:)

(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.९.२०२३)

याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/790084.html