Water Shortage : गोवा – वेळूस आणि म्हादई नद्यांच्या पाण्याची पातळी न्यून झाल्याने शेती-बागायतींना पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता

(प्रतिकात्मक चित्र)

वाळपई, ३० एप्रिल (वार्ता.) : सत्तरी तालुक्यातील वेळूस आणि म्हादई या नद्यांतील पाण्याची पातळी न्यून झाल्याने सरकारकडून चालू असलेल्या जलसिंचन योजनेवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक भागांत पाण्याचा तुटवडा भासत असल्याने याचा परिणाम शेती आणि बागायती यांवर होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी वर्तवली आहे.

जलसिंचन खात्याने बंधारे बांधण्याची योजना केल्यानंतर सत्तरीतील बर्‍याच भागांतील बरीचशी पडीक भूमी आता लागवडीखाली आली आहे. सत्तरीमधील रगाडा, वेळूस आणि वाळवंटी नद्यांमध्ये बंधारे बांधून सरकारने जलसिंचन योजना चालू केली आहे; परंतु आता वेळूस आणि म्हादई या नद्यांच्या पाण्याची पातळी न्यून झाल्याने शेती अन् बागायती यांच्यासाठी योग्य त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. पुढील महिन्यात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास त्याचा परिणाम शेती-बागायतींवर होण्याची शक्यता आहे.