उत्तर पश्चिम (वायव्य) येथील महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना !

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

रवींद्र वायकर

मुंबई – उत्तर-पश्चिम (वायव्य) येथून लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना देण्यात आली आहे. शिवसेनेच्या ‘एक्स’ खात्यावर वायकर यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांचे पूत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वेगळे होण्यापूर्वी रवींद्र वायकर हे सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

मुंबई महापालिकेचा मैदानासाठी राखीव असलेला ८ सहस्र चौरस मीटर भूखंड लाटल्याप्रकरणी आणि काळ्या पैशांप्रकरणी रवींद्र वायकर यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी चालू आहे. नुकताच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला आहे.