सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी (वय २८ वर्षे) यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा उच्च कोटीचा भाव !

पू. सौरभ जोशी यांच्या चरणी त्यांच्या २८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

चैत्र कृष्ण अष्टमी (१.५.२०२४) या दिवशी पू. सौरभ जोशी यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे वडील श्री. संजय जोशी यांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. सौरभ जोशी

‘वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. त्या दिवशी सकाळी मी पू. सौरभदादांना सांगितले, ‘‘आज श्रींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा) जन्मोत्सव आहे.’’ तेव्हा आमचे झालेले संभाषण येथे दिले आहे. (पू. सौरभदादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘श्री’ असे संबोधतात.)

श्री. संजय जोशी

मी : आज श्रींचा जन्मोत्सव आहे.

पू. सौरभदादा : नाही.

मी : हो ! खरंच आहे !

पू. सौरभदादा : नाही.

मी : श्रींचा जन्मोत्सव वगैरे असे काही नाही का ?

पू. सौरभदादा : नाही.

मी : त्यांना जन्म-मृत्यू असे काही नाही ?

पू. सौरभदादा : हो !

– श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (४.३.२०२४)

सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी (वय २८ वर्षे) यांचे द्रष्टेपण !

१. एका व्यक्तीच्या चाकरीच्या ठिकाणी होणार्‍या स्थानांतराविषयी त्या व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेनंतर पू. सौरभ यांनी ‘हो’ असे उत्तर देणे

‘आमच्या गावातील एक व्यक्ती आमच्या घरी आली होती. तिचे पू. सौरभदादांच्या आई सौ. प्राजक्ता जोशी यांच्याकडे ज्योतिषविषयक काम होते. ते काम झाल्यानंतर त्यांनी पू. दादांचे दर्शन घेतले. दर्शन घेतांना ती व्यक्ती हात जोडून आणि डोळे मिटून पू. दादांच्या चरणांकडे उभी होती. त्याच वेळी पू. दादा ‘‘हो’’ असे म्हणाले. थोड्या वेळाने त्या व्यक्तीने डोळे उघडले आणि आम्हाला विचारले, ‘‘पू. दादा ‘हो’ म्हणाले का ? त्यावर मी त्यांना ‘‘हो’’ म्हणून सांगितले. त्यावर त्यांनी सांगितले, ‘‘ते कामाला असलेल्या आस्थापनाने त्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा सोडून अन्यत्र लांबच्या जिल्ह्यात स्थानांतर केले होते. ‘घरच्या अडचणी लक्षात घेता त्यांना स्थानांतर रहित होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातच ठेवले जावे’, अशी प्रार्थना त्यांनी पू. दादांच्या चरणी मनातल्या मनात केली होती आणि पू. दादांनी त्याला ‘हो’ असे उत्तर दिले होते.

२. व्यक्तीने स्थानांतर रहित होण्यासाठी प्रयत्न करूनही स्थानांतर झालेल्या ठिकाणी कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगण्यात येणे आणि एक मासाने स्थानांतर रहित होणे अन् पुन्हा मूळ ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येणे

नंतर मी पू. दादांना पुन्हा स्थानांतर रहित होण्याविषयी विचारल्यावर त्यांनी मोठ्या स्वरात ‘हो’, असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने ‘स्थानांतर रहित व्हावे’, यासाठी प्रयत्न केले; मात्र त्यांना स्थानांतर झालेल्या ठिकाणी कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे ते तेथे उपस्थित झाले; मात्र त्यांची द्विधा स्थिती झाली होती. त्यानंतर एक मासाने त्या व्यक्तीला पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे ती व्यक्ती पू. दादांना भेटण्यासाठी घरी आली आणि पू. दादांच्या चरणी तिने कृतज्ञता व्यक्त करून पू. दादांना स्थानांतर रहित झाल्याचे सांगितले. तेव्हा पू. दादांनी शांत स्वरात ‘हो’, असे म्हटले.’

– श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग. (४.३.२०२४)

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पू. सौरभ जोशी यांचे अस्तित्व जाणवणे आणि त्यांचा आवाज ऐकू येणे

‘पू. सौरभदादा आता कुडाळ येथे असतात. यापूर्वी ते रामनाथी आश्रमात निवासाला होते. त्या वेळी मध्येच ते साधकांना मोठ्याने आणि आनंदाने बोलावत असत किंवा जयघोष करत असत. आता पू. सौरभदादा आश्रमात नसूनही मधे मधे दादा अन्य साधकांना बोलावत असल्याचे ऐकू येते, तसेच दादांचा जयघोषही ऐकू येतो. जणुकाही दादा आश्रमातच निवासाला आहेत. ही अनुभूती बर्‍याच साधकांना येते.’

– श्री. योगेश जलतारे (संपादक, सनातन प्रभात), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२३)

वासुदेवाप्रमाणे पोशाख असणारी एक व्यक्ती घरी येणे आणि ‘घरात स्वामींचा अवतार, तसेच दत्ताचा अंश असून ते बाळ ब्रह्मचारी आहे’, असे तिने पू. सौरभदादांविषयी उद्गार काढणे

‘३०.१.२०२४ या दिवशी सकाळी एक व्यक्ती घरी आली. तिचा पोशाख वासुदेवाप्रमाणे होता. त्यांनी ते श्री अंबाबाईचे गोंधळी असल्याचे सांगितले. त्या वेळी पू. सौरभदादा घरात आतल्या खोलीत होते. मी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेलो आणि त्यांना अर्पण दिले. त्यांनी माझे पूर्ण नाव विचारून अंबाबाईला प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी ‘मुलांची नावे काय ?’, असे विचारल्यावर मी त्यांना आमच्या दोन्ही मुलांची नावे सांगितली. त्या वेळी त्यांनी डोळे बंद केले आणि म्हणाले, ‘‘घरात स्वामींचा अवतार आहे. दत्ताचा अंश आहे. ब्रह्मचारी आहे, बाळ ते ..’’ मी त्यांना दोन्ही मुलांविषयी काहीही सांगितले नव्हते, तरीही त्यांचे वरील उद्गार ऐकल्यावर गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची) आठवण होऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’ – श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग. (४.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक