Rohingya Gang-Raped Tribal Girls:मेघालयात आदिवासी मुलींवर सामूहिक बलात्कार करणारे रोहिंग्या घुसखोर !

‘केंद्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’च्या अध्यक्षांनी व्यक्त केला संशय

शिलाँग (मेघालय) – ‘केंद्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी नुकताच मेघालयाचा दौरा केला. राज्यातील दक्षिण-पश्‍चिम गारो हिल्स या भागात असलेल्या अम्पती जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या आदिवासी उत्सवाच्या वेळी अल्पवयीन मुलींवर आक्रमण आणि सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हा भाग बांगलादेश सीमेला लागून असल्याने कानूनगो या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तेथे स्वत: गेले. या वेळी त्यांनी केलेल्या तपासानंतर म्हटले की, हे आक्रमणकर्ते रोहिंग्या घुसखोर असल्याचा संशय आहे.

या वेळी कानूनगो यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कानूनगो यांनी आश्‍वासन दिले की, सर्व गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल. एकही गुन्हेगार सुटणार नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या पातळीवर धोरण आखले जाईल, असेही ते म्हणाले.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपीसह ८ जणांना अटक केली आहे. या भागाचे पोलीस प्रमुख विकास कुमार यादव यांनी सांगितले की, आसाम पोलिसांसमवेतच्या संयुक्त कारवाईत मुख्य आरोपीला २७ एप्रिल या दिवशी मानकाचर येथून अटक करण्यात आली आहे.

मुलांच्या रक्षणासाठी सरकारने सर्व प्रकारे पावले उचलणे आवश्यक ! – प्रियांक कानूनगो

यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने प्रियांक कानूनगो यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्थानिक तक्रारदारांनी दिलेल्या विश्‍वसनीय माहितीच्या आधारावर या घटनेमागे रोहिंग्या असण्याची दाट शक्यता आहे. मुलांच्या रक्षणासाठी केवळ ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ लागू करणेच नाही, तर सरकारकडून सर्व प्रकारे पावले उचलली गेली पाहिजेत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी अथवा रोहिंग्या घुसखोर भारतात बलात्कार, आतंकवादी आक्रमणे यांसारख्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. त्यामुळे आता सरकारने ‘एन्.आर्.सी.’ (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) तात्काळ लागू करून घुसखोरांना हाकलण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे !