Pro-Khalistan slogans : कॅनडात पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा !

शिखांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे पंतप्रधान ट्रुडो यांचे आश्‍वासन !

टोरंटो – येथे ‘खालसा दिना’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शीख समाजातील लोकांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या कार्यक्रमाला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो उपस्थित होते. या वेळी शीख समुदायाला संबोधित करतांना पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शिखांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आश्‍वासन दिले. ते म्हणाले की, देशातील विविधता, ही आपली सर्वांत मोठी ताकद आहे.

 

ट्रुडो पुढे म्हणाले, ‘‘कॅनडात ८ लाख शीख आहेत. त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी मी सदैव तत्पर आहे. द्वेष आणि भेदभाव यांपासून मी नेहमीच शीख समुदायाचे रक्षण करीन. शीख समुदायातील लोकांनी न घाबरता त्यांचा धर्म आचरणात आणावा. कॅनडात मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य यांची हमी आहे आणि यासाठी मी शिखांसमवेत आहे.’’

भारताशी करार करण्याचा प्रयत्न करीन ! – ट्रुडो

पंतप्रधान ट्रुडो म्हणाले की, शीख लोकांना त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांना भेटायचे आहे. त्यासाठी मी भारत सरकारसमवेत नवीन करार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या करारानुसार, अमृतसरसह इतर शहरांमध्ये विमानसेवा चालू करता येईल.

भारत आणि कॅनडा यांचे संबंध बिघडले !

१८ जून २०२३ या दिवशी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याची  ब्रिटिश कोलंबियामध्ये हत्या झाली.  यानंतर पंतप्रधान ट्रुडो यांनी यात भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला; मात्र भारताने हा आरोप फेटाळून लावला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले.

संपादकीय भूमिका

भारताच्या मुळावर उठलेल्या खलिस्तानवाद्यांसह त्यांचे समर्थक असलेल्या ट्रुडो यांनाही भारत सरकारने समजेल अशा भाषेत उत्तर दिले पाहिजे !