‘कन्यादान’ एक अनोखा सोहळा !

‘हिंदु विवाह कायद्यानुसार लग्नात ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर केवळ ‘सप्तपदी’ महत्त्वाची आहे’, असे नुकतेच अलाहाबाद न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदु धर्मातील लग्न सोहळ्यात कन्यादानाचे महत्त्व अपरंपार आहे. ‘वडील-मुलीच्या नात्याचा अनोखा सोहळा’ म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे (उत्तरप्रदेश) न्यायाधीश सुभाष विद्यार्थी यांनी एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी दिलेल्या निर्णयामुळे हिंदु विवाह संस्था, सप्तपदी, कन्यादान, रूढीप्राप्त धर्मविधी, संस्कार इत्यादी अनेक विषयांवर प्रसिद्धीमाध्यमांत बातम्या येत आहेत. कुठलेही न्यायालय त्यांच्यापुढे असलेल्या याचिकांची वस्तूस्थिती लक्षात घेऊन आणि त्यासंदर्भात काय काय उपलब्ध आहे ? याचा विचार करून दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर निर्णय देत असते; परंतु त्या निर्णयानंतर अनेकांनी ‘कन्यादान योग्य कि अयोग्य ?’, यावर आपापले मत मांडले आहे. काही जणांनी तर न्यायालय कसे योग्य किंवा चुकीचे आहे ? यांवरही मत प्रकट केले आहे. न्यायालयाने कुठल्या परिस्थितीत असा निर्णय दिला, हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याखेरीज ‘त्यामागचा हेतू काय ?’ हे कळणे अशक्य आहे.

कन्यादान विधीचे संग्रहित चित्र

१. अलाहाबाद उच्च न्यायालयात नेमके काय घडले ?

आशुतोष यादव नामक युवकाचे वर्ष २०१५ मध्ये लग्न झाले होते. कन्यादान हा एक महत्त्वाचा रितीरिवाज आहे आणि त्या लग्नात ते झाले कि नाही ? याविषयी प्रश्न विचारण्यासाठी साक्षीदारास बोलावणे आवश्यक आहे. या अर्जावर निर्णय देतांना न्यायालयाने ‘हिंदु विवाह कायदा’ कलम ७ चा संदर्भ देत असे म्हटले, ‘त्यात कुठेही कन्यादानाचा उल्लेख नाही; पण सप्तपदीचा आहे. अग्निसाक्षीने सप्तपदी झाली, म्हणजे विवाह सोहळा पूर्ण झाला होय.’ पुढे न्यायालयाने या कलमाचा उल्लेख करत असे म्हटले, ‘या प्रकरणासाठी कन्यादान झाले किंवा नाही, हे महत्त्वाचे नाही’, असे सांगून आशुतोष यादव यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

२. हिंदु विवाह कायद्यातील कलम ७ चा अन्वयार्थ

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

कलम ७ हे दोन उपक्रमांमध्ये विभागलेले असून त्यांतील पहिल्या भागात असे दिले आहे, ‘हिंदु विवाह त्यातील कोणत्याही पक्षाचे रूढीप्राप्त धर्मविधी आणि संस्कार यांनुसार विधीपूर्वक लावता येईल.’ दुसर्‍या भागात ‘जिथे असे धर्मविधी आणि संस्कार त्यात सप्तपदी (म्हणजे वधू-वरांनी जोडीने होमाग्नीच्या साक्षीने ७ पावले चालणे) समाविष्ट असते, तेथे सातवे पाऊल टाकले जाते, तेव्हा विवाह पूर्ण आणि बंधनकारक होतो.’ अशा प्रावधानांनुसार (तरतुदीनुसार) जर योग्य प्रकारे विचार केला, तर दोन्ही पक्षकारांचे, म्हणजे वर-वधूचे जे काही रूढीप्राप्त धर्मविधी आणि संस्कार असतील, त्यानुसार लावलेले लग्न हे कायदेशीर मानले जाईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी पक्षकार सर्वोच्च न्यायालयात जाईल अथवा नाही तो त्यांचा निर्णय. तो तिथे गेल्यावर हा निर्णय अयोग्य होता कि योग्य ? हे येणारी वेळच ठरवेल; पण कलम ७ मधील प्रावधान समजण्यासाठी सामान्य माणसाला अधिवक्त्याची किंवा कुठल्याही न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता नाही, असे मला वाटते. या कलमाच्या दुसर्‍या भागामध्ये जे नमूद केले आहे, त्यानुसार ‘दोन्ही पक्षकारांच्या धर्मविधी आणि संस्कार यांमध्ये जर सप्तपदीचा सहभाग असेल, तरच सातवे पाऊल टाकल्यानंतर विवाह पूर्ण अन् बंधनकारक होईल’, असा अर्थबोध होतो.

३. सध्याच्या हिंदु विवाह कायद्यात हिंदु धर्मातील विधी आणि संस्कार यांविषयी स्पष्टता नाही !

या ठिकाणी एक सांगावेसे वाटते की, या कायद्यामध्ये कुठेही धर्मविधी आणि संस्कार म्हणजे नेमके काय ? याची व्याख्या दिलेली नाही. वर्ष १९५५ मध्ये बनवलेल्या या कायद्याविषयी कायदे करणार्‍यांना हे ठाऊक होते की, ‘हिंदु धर्मातील रितीरिवाज हे प्रत्येक जातीमध्ये, तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार वेगवेगळे असतात. त्यामुळे दोन्ही पक्षकारांच्या ज्या काही रूढीप्राप्त धर्मविधी आणि संस्कार आहेत, त्यांनुसार त्यांनी केलेले लग्न हे त्यांना बंधनकारक असेल’, असे कायद्यामध्ये नमूद केले आहे. विवाहासंदर्भात या रूढीप्राप्त धर्मविधी आणि संस्कार यांना आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने शब्दबद्ध केलेले दिसून येत नाही. तसे करणे शक्यही नाही. त्यामुळे ‘नेमका कुठला विधी केल्यास अथवा न केल्यास कायद्याच्या विरोधात होईल, याविषयीची स्पष्टता सध्याच्या हिंदु विवाह कायद्यात नाही’, असे मला वाटते.

४. विवाह संस्थेत कन्यादानाचे महत्त्व

विवाह संस्था आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. अगदी पुराणातसुद्धा कन्यादानाच्या अनेक कथा आपणास ऐकायला मिळतील. पहिले कन्यादान कुणी केले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असला, तरी कन्यादानाचे महत्त्व काही कमी झालेले नाही. कन्यादान हा संपूर्ण विवाह सोहळ्यातील अतिशय हळवा आणि भावनिक क्षण असतो. या क्षणाची वाट सर्वच जण बघत असतात. विवाह सोहळ्यातील संपूर्ण आनंदी अशा वातावरणात सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा हा क्षण ज्यात सर्वच जण भावनिक होतात, त्याविषयी ज्या व्यक्तीच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे किंवा होणार आहे, ती व्यक्ती योग्य प्रकारे सांगू शकेल.

हिंदु धर्मातील लग्न सोहळ्यात कन्यादानाचे महत्त्व अपरंपार आहे. लग्नातील सर्वांत महत्त्वपूर्ण संस्कारांपैकी तो एक मानला जातो. ‘कन्यादान म्हणजे दुसर्‍या मुलाच्या हाती आपल्या मुलीला सोपवणे’, असा अर्थ सहसा मानला जातो; मात्र कन्यादानाचा असा अर्थ नाही. हिंदु लग्नामध्ये एकूण २२ चरण असतात. त्यांमधील कन्यादान अत्यंत महत्त्वाचे चरण आहे. त्या संस्कारामध्ये मुलीचे वडील केवळ त्यांची मुलगी दान करत नाहीत, तर अग्नीला साक्षी ठेवून तिचे गोत्र दान करतात. त्यानंतर मुलगी आपल्या माहेरचे, म्हणजे वडिलांच्या कुळाचे गोत्र सोडते. आपल्या पतीच्या, म्हणजेच नवर्‍याच्या वंशाचे गोत्र धारण करते. त्यामुळेच कन्यादानाला महत्त्व प्राप्त होते. त्याखेरीज कन्यादान सर्वांत मोठे पुण्य असल्याचेही पूर्वपरंपरागत समजण्यात येते. इतकेच नाही, तर परंपरेनुसार मंत्रोच्चारणाच्या वेळी मुलाकडून ‘आपल्या मुलीला कायम सुखात ठेवण्याचे वचनही वडील मागून घेतात आणि आपल्या मुलीची सुरक्षा अन् तिच्या आनंदाचे दायित्व आपल्याप्रमाणेच मुलाने सांभाळावे’, असे सांगून वडील मुलीला त्याच्याकडे सुपुर्द करतात. कन्यादान म्हणजे वडील आणि मुलीच्या नात्याचा ‘अनोखा सोहळा’ मानला जातो.

५. हिंदु विवाह कायद्यामध्ये धर्मविधी आणि संस्कार यादृष्टीने संशोधन करून पालट करणे आवश्यक !

धर्म अथवा जाती कोणतीही असो, त्यामध्ये कुणाला हानी होत नाही, तसेच अशा परंपरांचे पालन केल्याने आनंद आणि समाधानच मिळते. अशा गोष्टी कितीही जुन्या असल्या, तरी त्यामध्ये आडकाठी आणण्याचे कारण नाही. ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, मग त्या कुठल्याही धर्मातील असू दे, त्यांविषयी वेळोवेळी कायदे बनवण्यात आलेले आहेत आणि त्यांना प्रतिबंध केलेला आहे. एक सांगावेसे वाटते की, कन्यादानासारख्या भावनिक विषयात कुणीही हात घालण्यापेक्षा हिंदु विवाह कायद्यामध्ये वेगवेगळ्या रूढीप्राप्त धर्मविधी आणि संस्कार यांच्या अनुषंगाने संशोधन करून पालट करणे आवश्यक आहे.

– अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, मुंबई उच्च न्यायालय (१३.४.२०२४)