संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलणारे संचालक अभिषेक जैस्वाल यांना अटक !

छत्रपती संभाजीनगर – मलकापूर को-ऑपरेटीव्ह बँकेच्या कोकणवाडी शाखेत बनावट कागदपत्रे देऊन १० जानेवारी २०१९ या दिवशी तब्बल ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलणारे संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिषेक जैस्वाल आणि मलकापूर को-ऑपरेटीव्ह बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी त्यांचा भाऊ अंबरीश यांना आर्थिक गुन्हे शाखेने २५ एप्रिलच्या रात्री ११ वाजता अटक केली. अभिषेक यांची पत्नी, बँकेचा मुख्य अधिकारी, शाखा व्यवस्थापक यांसह ७ जणांवर वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. न्यायालयाने वरील दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

‘बनावट कागदपत्रांद्वारे मलकापूर बँकेतून उचलले ९ कोटींचे कर्ज’ या मथळ्याखाली ‘डीबी स्टार’ने २० एप्रिल या दिवशी वृत्त प्रकाशित करत घोटाळा उघड केला होता. ज्या भूमीची कागदपत्रे जोडून कर्ज उचलले त्याचे मालक शेख फजल जुबेर अहमद यांनी बँक आणि पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानंतर मलकापूर बँकेचा राज्य वसुली अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा नोंद झाला. जैस्वाल याने प्रो. मेसर्स शक्ती एजन्सीच्या नावावर कर्ज उचलले होते. जामिनदार म्हणून पत्नी श्वेता, भाऊ अंबरीश आणि इतर साथीदार यांच्या साहाय्याने समर्थनगर येथील सिटी सर्व्हे क्रमांक १७८५०/२ मधील २३९५.९४ चौरस मीटर जागेची बनावट कागदपत्रे सिद्ध केली होती.