छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद !

छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केलेल्या इच्छुक उमेदवारांवर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे त्यांनी प्रविष्ट केलेल्या शपथपत्रातून उघडकीस आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर दंगलीचा, ‘एम्.आय.एम्.’चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यावर दरोड्याचा, महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्यावर बँक घोटाळ्याचा, तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. भुमरे आणि जाधव यांना न्यायालयाने प्रत्येकी १ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे; मात्र दोघांनीही या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या ५१ उमेदवारांनी ७८ नामांकन आवेदन निवडणूक आयोगाकडे प्रविष्ट केली आहेत. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यात सर्वाधिक ७ गुन्हे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर नोंद आहेत. त्याखालोखाल चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यावर प्रत्येकी ५ गुन्हे नोंद आहेत. संदिपान भुमरे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत ३ गुन्हे नोंद आहेत. पोलिसांकडून बहुतांश प्रकरणांत न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. यांपैकी फक्त भुमरे आणि जाधव यांना प्रत्येकी एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

संपादकीय भूमिका :

असे गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांना निवडून द्यायचे कि नाही, हे जनतेने ठरवावे. असे उमेदवार निवडून आले तरी ते खर्‍या अर्थाने मतदारसंघाचा विकास घडवून आणू शकतील का ?