जग तिसर्‍या स्फोटाच्या उंबरठ्यावर !

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय – कृत्रिम बुद्धीमत्ता) काय करू शकते ? याची चुणूक जगाला दिसू लागली आहे. या  तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ (प्रणेते) म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे ? ते विनाशक का होऊ शकते ? याविषयी आणि कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी मी जे काम केले,  त्याविषयी मला थोडा खेदच वाटतो’, हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे डॉ. जेफ्री हिंटन यांचे. ‘एआय’ या तंत्राच्या भयावह शक्यतांविषयी ‘मी नोकरीमध्ये असतांना मर्यादा  येतील, म्हणून त्यागपत्र देत आहे,’ असे डॉ. जेफ्री हिंटन यांनी ‘गूगल’ आस्थापन सोडतांना सांगितले.

मी याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो. वर्ष १८९६ च्या आसपास ‘डायनामाईट’चा (स्फोटकांचा) शोध लावणार्‍या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला. वर्ष १९४५ मध्ये ‘मॅनहॅटन  प्रोजेक्ट’मधील अणूबाँबचा शोध लावणारा ओपेनहायमरचा स्फोट दुसरा. आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर ‘आल्फ्रेडचेच निधन झाले आहे’, असे समजून एका वृत्तपत्राने ‘मृत्यूच्या व्यापार्‍याचे निधन’ अशी बातमी छापली. आपण  मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल ? कसे आठवेल ? याविषयीची ‘याची देही याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने पापक्षालनासाठी ‘नोबेल  पारितोषिका’ची घोषणा केली. याच ‘नोबेल पारितोषिका’साठी वर्ष १९४६, १९५१ आणि वर्ष १९६७ असे ३ वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहायमरने अणूबाँब बनवला. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे ओपेनहायमरने खेद व्यक्त केला होता. आता ‘डॉ. जेफ्री हिंटन यांचे त्यागपत्र आणि त्यानंतरची खेदयुक्त काळजी’, हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच !

१. डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्यागपत्र देण्यामागची ३ कारणे

इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही डॉ. जेफ्री हिंटन यांनी आताच त्यागपत्र देण्यामागे मला ३ कारणे वाटतात.

अ. पहिले म्हणजे ‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकर्‍या न्यून होण्याचे भाकित वर्तवले जात आहे. त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल.

आ. दुसरे म्हणजे अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एल्.एल्.एम्. – कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे वापरली जाणारी प्रणाली) घातलेला धुमाकूळ.

इ. तिसरे म्हणजे या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे सिद्ध होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती. ‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे  ड्रोन एकत्रित काम करतात. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात. या आक्रमणातून बचाव होणे शक्य नाही. ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली, त्यात डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

२. ‘एआय’विषयी अनेक विचारवंतांना वाटणारी भीती

डॉ. भूषण केळकर

‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे सामाजिक माध्यमांवर बनावट (खोटी) छायाचित्रे, व्हिडिओ, लिखाण यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना त्याविषयी खात्री वाटते. हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणार्‍या आणि आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरित लोकांच्या हाती पडल्यास जगाचा  विनाश अटळ आहे, याविषयीही त्यांच्यात एकवाक्यता आहे. याही पुढे जात ‘जगाचा विनाश होईल का ?’, यापेक्षा ‘कधी होईल ?’, एवढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करत आहेत.

याच प्रकारची विधाने आणि काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करत आहेत. आपण ती ऐकत आणि वाचत आहोत. अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’ने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांना ‘एआय’चा दायित्वपूर्वक वापर अन् त्यासाठीचा आराखडा करणे’, यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनसह अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाईट हाऊसने १४ कोटी डॉलर घोषित केले आहेत.

‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ हे पुष्कळ जुने आस्थापन आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अतीप्रगत करण्यात आणि तिचे वर्ष २०१२ मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये (यांत्रिक स्वयंशिक्षणाची एक पद्धत) रूपांतर करण्यात डॉ. हिंटन यांचे मोलाचे योगदान आहे. या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. डॉ. हिंटन म्हणतात, ‘हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती भयावह आहे.’

३. ‘एआय’मुळे उद्भवणारी परिस्थिती आणि परिणाम

काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली. ‘वॉरेन बफे’ या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तर ‘एआय’ला ‘दुसरा अणूबाँब’, म्हटले आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील’, याच्या अनेक पाऊलखुणा दिसत आहेत. ‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले की, ‘चॅट जीपीटी’ कथा आणि पटकथा लिहून देणार असेल, तर लेखकांना कोण  मानधन देणार ? नुकतीच एक बातमी वाचनात आली की, ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला. ‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक घोषित झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती.

‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी आणि वर्ष २०१३ मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती, म्हणजेच ‘इंडस्ट्री ४.०’ किंवा ‘आय ४.’ याला मागे टाकत गेल्या १० वर्षांत ‘इंडस्ट्री ५.०’ उदयाला आली आहे. यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन  सुखावह (कि आळशी ?) झाले, तरी असंख्य नोकर्‍यांवर गदा येऊन सामाजिक अस्थैर्य वाढेल.

प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’ पुस्तकाचे लेखक) यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे, ‘९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल.’ यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, ‘एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले, तर त्यांना ‘रोबो कर’  लावण्यात यावा.’ ‘एआय’वरील संशोधन

६ मास थांबवावे’, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि विचारवंत सुचवत आहेत. तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम आणि मानवाने केलेले काम यांत भेद करता आला नाही, तर त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत.

४. पुढच्या काळात मानवाची स्पर्धा ‘एआय’शीच असणार !

‘एवढे सामाजिक अस्थैर्य आणि विध्वंस होणार असेल, तर ‘एआय’ करायचेच कशाला ?’, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो. शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे. त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात ! ‘एआय’मध्ये काम करणार्‍या कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची खुली स्पर्धा आहे हे नि:संशय ! या स्पर्धेत आपण टिकून रहाण्यासाठी शिक्षणपद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’, म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’च्या पलीकडचे ज्ञान द्यावे अन् विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न रहाता स्वत:चा तारतम्य भाव वापरावा. यापुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’सह काम करणार्‍या मानवांशी अधिक असेल.

५. येऊ घातलेल्या विध्वंसावर संतांनी सांगितलेला वैश्विक उपाय

‘सर्वोदया’च्या अनुषंगाने आचार्य विनोबा भावे यांना विचारले गेले, ‘गांधीवादी असल्याने तुमचा तंत्रज्ञानाला विरोध आहे का ?’ त्यावर विनोबांनी तंत्रज्ञानाचे ३ प्रकार सांगितले.

अ. समयसाधक : विमान, गाडी वगैरे
आ. उत्पादक : यंत्रे इत्यादी
इ. संहारक.

त्यांनी म्हटले, ‘संहारक’ यंत्रे नकोतच; पण ‘उत्पादक’मधील श्रमिकांची जागा बळकावणारी यंत्रेही नको.’

उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे पावसचे प.पू. स्वामी स्वरूपानंद. त्यांची मला आवडलेली ओवी अशी आहे, ‘अंतरी सद्भाव, असेल जागृत । तरी यंत्रेहित, स्वामी म्हणे ॥’ लौकिक अर्थाने तंत्र, यंत्र यांच्याशी दुरान्वये संबंध न आलेल्या २ द्रष्ट्यांनी ‘एआय’च्या अजून अव्यक्त; पण येऊ घातलेल्या विध्वंसावर वैश्विक उपाय सांगितला आहे.

– डॉ. भूषण केळकर, बी.टेक्. आयआयटी मुंबई आणि पीएच्.डी., पुणे. (साभार : ‘सफर विज्ञान विश्वाची’ फेसबुक)

संपादकीय भूमिका 

जगात येऊ घातलेल्या विध्वंसाला रोखण्याचे सामर्थ्य केवळ न केवळ हिंदु धर्मामध्येच आहे !