छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !

शहराचा पाणीपुरवठा धोक्यात !

छत्रपती संभाजीनगर – महापालिकेने जलसंपदा विभागाचे ४० कोटी रुपये न भरल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. शहराची तहान भागवण्यासाठी प्रतिदिन जायकवाडी धरणातून १३० ते १३५ एम्.एल्.डी. पाण्याचा उपसा करण्यात येतो. या पाण्याचे देयक प्रतिमहा जलसंपदा विभागाला भरावे लागते; मात्र मागील काही वर्षांपासून महापालिकेने पैसे भरले नाहीत. फेब्रुवारीमध्ये जलसंपदा विभागाने ४० कोटी रुपयांची थकबाकी भरावी; म्हणून नोटीसही दिली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विभागाकडून कोणत्याही क्षणी बंद केला जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने काही घंटे पाणीपुरवठा थांबवला होता.

पाणीपट्टीपोटी महापालिकेचे १५ कोटी रुपये थकित !

‘जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीपोटी महापालिकेचे १५ कोटी रुपये थकित आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम ४० कोटी रुपये केली आहे’, असे महापालिकेतील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. प्रतिवर्षी काही ठराविक रक्कम महापालिकेकडून भरण्यात येते. व्याज आणि दंड महापालिका भरू शकत नाही, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • कोट्यवधी रुपयांची थकबाकी कशी काय रहाते ?
  • कोट्यवधी रुपयांची थकबाकी करणारी महापालिका जिल्ह्याचा कारभार कशी करत असेल ? संबंधित अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !