नाशिक – नाशिक लोकसभा जागावाटपात मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेचा अर्ज मागे घेतल्यानंतर विविध घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) पदाधिकारी अंबादास खैरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक, निकटवर्तीय आणि विश्वासू असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतला आहे. ही छगन भुजबळांचीच मोठी खेळी असल्याची चर्चा आहे.
येथे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी मतदारसंघात प्रचारही चालू केला असून मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत नाशिकची जागा शिवसेना लढवणार, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. भाजपही येथील जागा लढवण्यास इच्छुक आहे.