जळगाव येथील श्री. वेदांत सोनार (वय २० वर्षे) याला साधनेतून आनंद मिळू लागल्याने त्याने गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

श्री. वेदांत सोनार

१. सनातन संस्थेच्या धर्मशिक्षणवर्गात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ची ओळख होणे

‘वर्ष २०२३ जानेवारी मध्ये माझा महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मोठ्या भावाच्या आस्थापनात (कंपनीत) साहाय्य घेण्यासाठी गेलो. तिथे ‘सनातन संस्थे’कडून साप्ताहिक सत्संग घेतला जातो. श्रीगुरूंच्या कृपेने मी आस्थापनात गेलो, नेमका त्याच दिवशी आस्थापनात सत्संग होणार होता. मी तिथे अभ्यासक्रमासाठी गेलो होतो. तेव्हा मला काहीच ठाऊक नव्हते. ‘सत्संगामुळे माझा अभ्यासक्रमातील वेळ व्यर्थ जाईल’, असे मला वाटले होते. श्री गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) मला सत्संग लाभला. त्यात गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली. तेव्हा मी पहिल्यांदाच ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’विषयी ऐकले.

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी माहिती नसूनही त्यातून आनंद मिळणे

सत्संगातील साधक उपस्थित असलेल्यांना सारणी लिखाणाविषयी सांगत होते. तेव्हा मला ‘पुष्कळ काही मिळत आहे’, असे वाटले. त्या आस्थापनात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी कुणी प्रयत्न करत नव्हते. ‘हे किती अमूल्य ज्ञान आहे. साधक ते किती तळमळीने सर्वांना सांगत आहेत !’, असे मला वाटले. मी त्या वर्गानंतर साधकांची भेट घेतली. रात्री मी एका जुन्या वहीत चुका लिहिण्याचा प्रयत्न केला, तसेच मी प्रार्थना, नामजप आणि कृतज्ञता इत्यादी सूत्रेही त्या वहीत आढाव्यासहीत लिहिली. श्री गुरूंच्या कृपेने प्रक्रियेची पूर्ण माहिती नसतांनाही मला त्यात आनंद मिळाला. याच भावाने मी प्रतिदिन सारणी लिखाण करू लागलो.

३. प्रतिदिन प्रक्रिया करणे आणि रात्री स्वतःचा आढावा लिहिल्यामुळे आनंद मिळणे

मी श्री गुरुकृपेने सारणी लिखाण आणि नामजप यांचे प्रयत्न एका सप्ताहात पूर्ण केले. मला आता सत्संगात जाण्याची उत्सुकता वाटू लागली. साधकांना सत्संगानंतर सारणी लिखाण दाखवून त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन मला मिळाले. आता या प्रक्रियेत मला पुष्कळ आनंद मिळू लागला. सांगितलेल्या सूत्रांनुसार स्वयंसूचना व्यवस्थितपणे बनवणे मला जमत नव्हते; मात्र मला प्रतिदिन प्रक्रिया करणे आणि रात्री स्वतःचा आढावा लिहिणे यांत आनंद वाटत होता. प्रतिदिन रात्री विलंब झाला, तरी मी लिखाण करून झोपत असे. ‘सत्संग घेणार्‍या साधकांमध्ये असलेली नम्रता, सहजता आणि इतके मोठे ज्ञान व्यवस्थित समजावून देणे इत्यादी गोष्टी मला विनामूल्य मिळत आहेत’, असे मला वाटत होते.

४. रामनाथी आश्रमात आल्यावर देवलोकात आल्यासारखे जाणवणे

सारणी लिखाण करायला प्रारंभ करून एक मासच झाला होता, तरीही साधकांच्या मार्गदर्शनाखाली रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मला मिळाली. ‘आश्रमात सारणी आणि साधना यांविषयी सर्व शिकून घ्यायचे आहे’, असे मला वाटत होते. रामनाथी आश्रमात येऊन मला पुष्कळ हलके वाटत होते. मी देवलोकात आल्यासारखे मला जाणवत होते. ‘आश्रमाशी माझी जुनी ओळख आहे. हे माझे घरच आहे’, असे मला वाटत होते.

५. श्री गुरूंना पाहिल्यानंतर ‘श्री गुरु माझे आहेत आणि मी त्यांचा आहे, ही कदाचित् अनेक जन्मांची ओळख आहे’, असे जाणवणे

सत्संगात श्री गुरूंची वाट पहात असतांना श्री गुरूंचे आगमन झाले. तेव्हा मी त्यांना सर्वप्रथम पाहिले. त्यांना पहाताच माझे डोळे पाणावले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ‘मला माझे सर्वकाही असणारे भेटले’, असे मला वाटत होते. श्री गुरु माझे आहेत आणि मी त्यांचा आहे, ही कदाचित् अनेक जन्मांची ओळख आहे’, असे मला जाणवले. ते मला मिळाले; म्हणून माझा भाव जागृत होऊ लागला. माझ्या मनात सातत्याने खंत वाटत होती, ‘मी इतके दिवस श्री गुरूंपासून दूर होतो. त्यांनी मला परत बोलावले; पण मीच विलंब करत होतो.’ मी गुरुदेवांची क्षमा मागितली.

६. आश्रमातून घरी परत जाण्याची इच्छा नसणे आणि ‘श्री गुरूंनी जीवनाचे विशाल ज्ञान दिले आहे’, यासाठी कृतज्ञता वाटणे

रामनाथी आश्रमातून घरी परत येतांना मला कृतज्ञता वाटत होती. ‘महान परब्रह्मतत्त्व असणारे श्री गुरु यांना मी भेटू शकलो. आश्रमात इतके दिवस रहाण्याची संधी मिळाली. आश्रमातील प्रत्येक साधक आपला आहे’, असे मला वाटत होते. परत जाण्याची मला इच्छा नव्हती. श्री गुरूंनी इतके विशाल ज्ञान माझ्या सारख्या पामराला सहज सांगितले. जीवनातील प्रत्येक कृती, प्रत्येक गोष्ट ज्यामुळे शक्य आहे, असे विशाल ज्ञान त्यांनी मला दिले, उदा. अष्टांग साधना, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, आवरण काढणे, अनिष्ट शक्तींचे त्रास आणि दैवी तत्त्वाशी एकरूप कसे व्हावे ? इत्यादी.

७. श्री गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग; म्हणून व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे ध्येय ठेवून प्रयत्न करणे

‘अशा विशाल ज्ञानाला कृतज्ञता कशी व्यक्त करावी ?’, असे वाटू लागले. ‘आपले अधिकाधिक प्रयत्न वाढवूनच आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो’, असे वाटून व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे ध्येय घेतले. ‘हे ध्येय पुढील वेळेस आश्रमात येण्यापूर्वी तुम्हीच पूर्ण करून घ्या’, अशी गुरूंना प्रार्थना केली. आश्रमातून घरी परतण्याच्या २ ते ३ आठवड्यात समष्टीचे ध्येय श्री गुरूंनी पूर्ण करून घेतले. आमच्या गावी वसाहतीत (कॉलनीत) सत्संग चालू झाला.

– श्री. वेदांत अरुण सोनार (वय २० वर्षे), जळगाव, महाराष्ट्र.

श्री गुरुस्तुती !

‘हे गुरुदेवा, तुम्ही आम्हाला साधनेत स्वीकारले आणि साधना शिकवली. मी साधनेत आलो. तेव्हापासून सगळेच पालटून गेले. पूर्वी माझे जीवन असे नव्हते. तेव्हा वेगळेच मायेचे जीवन होते. आता तुम्ही सगळेच पालटून टाकले. आता असे वाटते, ‘साधना हेच माझे जीवन आहे.’

श्री गुरुदेवा, तुम्हीच ‘विष्णु’ आहात. तुम्हीच ‘आदी’ आहात. तुम्हीच ‘अंत’ आहात.

तुम्ही एक रूप (देह) नव्हे, तर तुम्ही एक ‘विशाल तत्त्व’ आहात. जिथे कुणीच नसते, तिथेसुद्धा ‘तुम्ही’ असता आणि जिथे ‘तुम्ही’ असता, तिथे कुणी नसले, तरी चालते. गुरुदेवा, मला केवळ तुम्हीच पाहिजेत. तुमच्याविना काही नको.

संपूर्ण सृष्टी नव्याने रचणारे, ‘हिंदु राष्ट्र’ सहजतेने स्थापन करू शकणारे, साधकांची साधना व्हावी; म्हणून सर्वांना टप्प्याटप्प्याने पुढे घेऊन जाणारे, संपूर्ण सृष्टीला कलियुगातून सत्ययुगात घेऊन जाणारे, अनेकातून एकात, एकातून सर्वांत, सर्वांतून ‘परमात्म्यात’, परमात्म्यातून ‘परब्रह्मात’, तुम्हीच ‘सत्य’ आहात.

या विश्वाचे ‘रचेता’ तुम्हीच आहात. तुमच्यात सर्वकाही आहे आणि सर्वांमध्ये तुम्हीच आहात. तुमच्याविना जीवन नाही. तुमच्याविना श्वास हा श्वास नाही. प्रत्येक श्वास हा केवळ तुमच्या ‘स्मरणातच’ असावा, नाहीतर माझ्यात श्वासच नसावा. एक दिवस सगळ्याचा त्याग करत, शेवटचा श्वास सुद्धा तुमच्याच चरणांशी अर्पण व्हावा. तिथे ‘मी’ नसावे, केवळ ‘तुम्हीच’ असावे.’

– श्री. वेदांत अरुण सोनार

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक