Railway Waiting Ticket Cancellation : वेटिंग तिकीट रहित केल्यावर पैसे कापले जाणार नाहीत !

भारतीय रेल्वेचा नवा नियम !

(वेटिंग तिकीट म्हणजे तिकीट निश्‍चित न झाल्याने प्रतीक्षा सूचीत असतांना काढलेले तिकीट)

नवी देहली – भारतीय रेल्वेच्या नव्या नियमानुसार आता वेटिंग आणि आर्.ए.सी. (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन. यामध्ये एकाच बर्थवर २ प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. यात तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूप अधिक असते.) तिकीट रहित करण्यासाठी रेल्वे स्वतंत्र शुल्क आकारणी करणार नाही. इतर तिकिटांसाठी मात्र रहित केल्यानंतर शुल्क भरावे लागणार आहेत.

झारखंडमधील सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमार खंडेलवाल यांनी रेल्वेकडे अर्ज केला होता. त्यात शुल्क स्वरूपात किती रक्कम वसूल होते आणि किती रक्कम जमा होते ?, यावषयीची माहिती मागितली होती. माहिती मिळाल्यानंतर रेल्वे केवळ तिकीट रहित केल्यानंतरच्या शुल्कातून भरपूर पैसे मिळत असल्याचे आणि प्रवाशांची मोठी हानी होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. एका प्रवाशाने १९० रुपयांचे तिकीट घेतले. कन्फर्म सीट मिळाली नव्हती. त्याने तिकीट रहित केल्यावर त्याला केवळ ९५ रुपये परत मिळाले.

वन्दे भारत रेल्वेमध्ये आता १ लिटर ऐवजी अर्धा लिटर पाण्याची बाटली मिळणार !

वन्दे भारत रेल्वेत आतापर्यंत प्रवाशांना एक लिटर पाण्याची बॉटल देण्यात येत होती. आता प्रत्येक प्रवाशाला ५०० मिलीलीटरची, म्हणजे अर्धा लिटरची पिण्याच्या पाण्याची बाटली देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी थांबेल. गरज पडल्यास प्रवाशी पाण्याची अतिरिक्त बाटली मागू शकतो. त्याला रेल्वे अर्धा लीटरची पाण्याची बाटली देईल. त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.