पुणे जिल्ह्यांत हिंदूंमध्ये शौर्यजागृती व्हावी यासाठी आयोजित ‘गदापूजन’ उत्साहात पार पडले !

गदापूजन करताना सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. मनीषा पाठक

पुणे, २३ एप्रिल (वार्ता.) – प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागृती व्हावी, यासाठी हनुमान जयंतीच्या निमित्ताने पुणे येथे सातारा रस्ता, हिवरे गाव, धनकवडी, राजगुरुनगर, कोकडेवाडी शिरूर, तळजाई, मोई गाव, मंचर, नवलेवाडी, चव्हाणनगर, सासवड, चांडखेड, गावठाण, पिंपळखुटे आणि आढे गाव, पारगाव सालू मालू, आळंदे, आळंदेवाडी, खंडोबाची वाडी, नेरे, गोकवडी, आंबाडे, कोकडेवाडी, पिंपळगाव, हडपसर, नवलेवाडी, जेजुरी, बोपगाव, मुरुम, काळेवाडी आदी एकूण १०२ पेक्षा अधिक ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले असून काही ठिकाणी मारुति मंदिरांत साकडे घालण्यात आले. या कार्यक्रमांना विविध संघटनांचे पदाधिकारी, मंदिरांचे विश्वस्त, धर्मप्रेमी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता. यानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला. या उपक्रमामध्ये हिंदु जनजागृती समिती, धर्मप्रेमी, वाचक, हितचिंतक आणि भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

काळेवाडी येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित महिला

हनुमान जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये मंदिर स्वच्छता, फलक प्रसिद्धी, सामूहिक नामजप आणि मारुतिस्तोत्र पठण, प्रवचन तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरांत ग्रंथ, सात्त्विक उत्पादनांचे कक्ष, फ्लेक्स प्रदर्शन लावणे, असे विविध उपक्रम राबवण्यात आले. २३ एप्रिल या दिवशी ठिकठिकाणच्या मारुति मंदिरांत लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या कक्षाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सुवर्ण मारुति मंदिर, पद्मावती, सातारा रस्ता येथील गदापूजन

वैशिष्ट्यपूर्ण

१. भिकारदास मारुति मंदिर, बाजीराव रस्ता, पुणे या ठिकाणी सद्गुरु स्वाती खाडये, पू. (सौ.) मनीषा पाठक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते गदापूजन करण्यात आले.

२. काळेवाडी येथे चालू असलेल्या ‘हरिनाम सप्ताह’च्या शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनामध्ये ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गदापूजन केले.‌ सोहळ्यामध्ये ह.भ.प. प्रविणनाना लोळे महाराज यांच्या हस्ते गदापूजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हनुमान जयंतीचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन झाले. ४०० हून अधिक ग्रामस्थांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

भोर येथील गदापूजन

३. हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिवरे गाव येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रामस्थ आणि धर्मप्रेमी यांनी मोठ्या उत्साहात गदापूजन केले. या वेळी सर्वांनी १०८ वेळा हनुमंताचा सामूहिक नामजप केला.

रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेतांना धर्माभिमानी

४. हनुमान मंदिर, सासवड येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात गदापूजन झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मारुतीच्या उपासनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन झाले. सर्व उपस्थितांनी मोठ्या उत्साहात श्रीराम आणि हनुमंताच्या घोषणा दिल्या.

गदेला डोके ठेवून भावपूर्ण दर्शन घेतांना भाविक

५. नवलेवाडी येथे गदापूजन झाले. धर्मप्रेमी आणि ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला. येथे गदा उपलब्ध न झाल्याने मातीची गदा बनवून भावपूर्ण पूजा, आरती केली.

६. पर्वती पायथा येथील शनी मारुति मंदिरात गदापूजन झाल्यावर गदा परत नेत असतांना सर्व भाविक हातातील गदेला डोके ठेवून नमस्कार करत होते. बाहेरील वस्तू विक्रीच्या स्टॉलवरील विक्रेत्यांनी नारळ, माळ अशा वस्तू गदेला अर्पण करून दर्शन घेतले.

संपादकीय भूमिका

हिंदूंनी शस्त्रपूजन करणे, हे त्यांच्यातील क्षात्रवृत्तीच्या वाढीसाठी पोषक आहे !