Chinese Military Activity In Space : चीन अंतराळात सैनिकी कारवाया करत असून चंद्रावर नियंत्रण मिळवू शकतो !

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या प्रशासकांचा दावा !

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीन नागरी कामांच्या नावाखाली अंतराळातील सैनिकी कारवाया लपवण्याचा प्रयत्न करत आहे. चीन चंद्रावर नियंत्रण मिळवू शकतो, असा दावा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्थेचे (‘नासा’चे) प्रशासक बिल नेल्सन यांनी केला आहे.

१. ‘नासा’च्या नेतृत्वाखालील ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’मध्ये युरोप, कॅनडा, जपान आणि रशियासह १५ देशांतील ५ अंतराळ संस्थांचा समावेश आहे; पण अवकाशाविषयी चीनचा दृष्टीकोन याच्या उलट आहे. तो सहयोगी व्यवस्थापनाऐवजी एकटा काम करतो. चीनचे स्वतःचे ‘स्पेस स्टेशन’ आहे, जे ३ अंतराळवीर चालवतात.

२. नासा त्याच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांसमवेत चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्याची योजना आखत आहे. त्याला वर्ष २०२६ पर्यंत मानवाला चंद्रावर घेऊन जायचे आहे. दुसरीकडे चीनने वर्ष २०३० पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची योजना आखली आहे. यावरून दोन्ही देशांमध्ये चालू असलेली स्पर्धा दिसून येते.

संपादकीय भूमिका

चीनची पृथ्वीवरील विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पहाता अंतराळातही तो असेच वागणार यात शंका नाही ! त्यामुळे संपूर्ण जगाने चीनच्या विरोधात संघटित होऊन लढण्याची आवश्यकता आहे !